Join us

वसतिगृहांना अद्यापही जादा वीजदराचा 'शॉक '

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 3:38 PM

Extra power tariff : ग्राहकांनी हरकती नोंद कराव्यात.

मुंबई : खाजगी व सार्वजनिक वसतिगृहांना १ एप्रिलनंतरही सार्वजनिक सेवा या सवलतीच्या वीजदराऐवजी जुन्या लघुदाब घरगुती या जादा वीजदराने आकारणी होत आहे. या ग्राहकांनी हरकती नोंद कराव्यात. हरकतीची पोहोच घेतलेली प्रत व अंतिम बिलाची प्रत संघटनेकडे पाठवावी, असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी केले आहे.वीज आयोगाने २०२० ते २०२५ या कालावधीसाठी दरनिश्चिती आदेश ३० मार्च २०२० रोजी जाहीर केले आहेत. या आदेशानुसार सर्व प्रकारच्या वसतिगृहांना सार्वजनिक सेवा, शासकीय अथवा सार्वजनिक सेवा, अन्य या वर्गवारीनुसार वीजदर आकारणी १ एप्रिल पासून सुरु होणे आवश्यक होते. मात्र वसतिगृहे व खाजगी शाळा व महाविद्यालये यांच्याशी संलग्न असलेली विद्यार्थी वसतिगृहे यांच्या बाबतीत आदेशात त्रुटी असल्याने अद्यापही लघुदाब घरगुती या जादा वीज दराने आकारणी सुरु आहे. या त्रुटी दूर करून योग्य आकारणी लागू करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.दुसरीकडे सर्व वसतिगृहांना सार्वजनिक सेवा शासकीय वा सार्वजनिक सेवा अन्य या वर्गवारीनुसार वीजदर आकारणी सुरु करण्यात आली आहे, असा दावा महावितरणने केला आहे. तथापि लघुदाब घरगुती वीजदराने आकारणी होत आहे. अशी माहिती व पुरावे आयोगासमोर दाखल करणे आवश्यक आहे. त्यासाठी सवलतीचा दर लागू झालेला नसल्यास हरकत नोंद करावी. या वर्गवारीमध्ये शाळा व महाविद्यालये यांच्याशी संलग्न असलेली सर्व वसतिगृहे, तसेच संलग्न नसलेली अन्य सर्व विद्यार्थी वसतिगृहे, कर्मचारी पुरुष व महिला वसतिगृहे निराधार अनाथ व दिव्यांग वसतिगृहे, मनोरूग्ण व बाल सुधारगृहे, धर्मशाळा, निर्वासित व आपदग्रस्त छावण्या, अनाथाश्रम वसतिगृहांचा समावेश आहे.

 

टॅग्स :महावितरणमुंबईमहाराष्ट्रसरकार