मुंबई : अवेळी पडलेल्या पावसामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमानात काही अंशी घट नोंदविण्यात येत असतानाच दुसरीकडे मात्र मुंबईकर कडक उन्हामुळे त्रस्त झाले आहेत.मागील तीन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरावर दाटून आलेले मळभ शुक्रवारी निवळले. परिणामी, मोकळ्या झालेल्या आकाशातून थेट पडलेल्या सूर्यकिरणांमुळे मुंबईकरांना कडक उन्हास सामोरे जावे लागले. शुक्रवारी मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश होते. तरी ऊन, उकाड्याने मुंबईकरांसाठी दिवस तापदायक ठरला.भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित घट झाली. दरम्यान, शनिवारसह रविवारी मुंबई, आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २४ अंशाच्या आसपास राहील.
तापदायक दिवस; कडक उन्हामुळे मुंबईकर त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 5:46 AM