दिवसा चटके, रात्री उकाडा; पारा चाळिशीकडे, राज्यात काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 08:52 AM2024-03-30T08:52:31+5:302024-03-30T09:24:38+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारची सकाळ ढगाळ वातावरण होते. मुंबईकरांना शनिवारीही दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली.
मुंबई : मुंबईसह राज्यभरातील शहरांचे कमाल तापमान ३५ ते ४० अंशांदरम्यान नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकर दिवसा उन्हाच्या चटक्याने, तर रात्री उकाड्याने हैराण झाले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारची सकाळ ढगाळ वातावरण होते. मुंबईकरांना शनिवारीही दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली.
मुंबईसह कोकणवगळता महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांत शनिवारी ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. तर, विदर्भातील जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवते. संपूर्ण विदर्भ व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही ठिकाणी दुपारी ३ वाजताचे कमाल तापमान हे ४० ते ४२ अंश सेल्सिअस जाणवत असून, ते सरासरी कमाल तापमानापेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने अधिक आहे.
दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव
मुंबईसह कोकणवगळता महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांत शनिवारी दिवसा उष्णतेची काहिली, तर रात्री उकाडा जाणवू शकतो. मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यांत तसेच लगतच्या गोवा व गुजरातमध्ये शनिवारी दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
उष्णतेच्या लाटा
विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही भागात रात्री उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. विदर्भात एकाकी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
वादळ, वारा
उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस आणि ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.