Join us

‘हॉट की एटीव्हीएम’ थंड बस्त्यात

By admin | Published: March 16, 2016 8:36 AM

तिकीट खिडकीसमोर लागणाऱ्या लांबच लांब रांगा टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी मध्य रेल्वे हॉट की एटीव्हीएम या पर्यायाचा विचार करत आहे. मात्र, या मशिन आणण्यात

मुंबई : तिकीट खिडकीसमोर लागणाऱ्या लांबच लांब रांगा टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी मध्य रेल्वे हॉट की एटीव्हीएम या पर्यायाचा विचार करत आहे. मात्र, या मशिन आणण्यात ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम’कडून (क्रिस) हिरवा कंदील मिळत नसल्याने अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या ही यंत्रणा थंड बस्त्यात आहे.तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी एटीव्हीएम (आॅटोमेटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स) आणि जनसाधारण तिकीट (जेटीबीएस) हे दोन पर्याय मरेने उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, अजूनही एकूण तिकीट विक्रीपैकी ६५ टक्के विक्री तिकीट खिडक्यांवरच होते, तर एटीव्हीएम आणि जनसाधारण तिकीट योजनेतून उर्वरित ३५ टक्के तिकिटांची विक्री होते. मरेने एटीव्हीएम दिली असली तरीही काहींना ती वापरास अवघड वाटत असल्याने प्रवासी तिकीट खिडकीचा पर्यायच निवडतात. तिकीट काढताना प्रवाशांच्या सोयीसाठी ‘हॉट की मशिन’च्या वापराची शिफारस केली जात आहे. या मशिनद्वारे स्थानकांऐवजी स्थानकांमधील अंतरानुसार ठरलेल्या दरांच्या अनुषंगाने तिकीट मिळणार आहे. मात्र, क्रिसने असे मशिन विकसित करण्याऐवजी रेल्वे किंवा खासगी कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित करावे, अशी भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)खासगी कंपन्या अनुत्सुक- हॉट की सुविधा असणारे एक मशिन तयार करण्यासाठी ६ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. उत्पादनासाठी परवानगी घेतली जाते. मग निविदा प्रक्रिया राबवून त्यानंतरच मशिन विकसित करण्याचे कंत्राट दिले जाणार आहे. त्यामुळे खासगी कंपनीकडून हे मशिन विकसित करून घेतल्यास त्या कंपनीला उत्पादनासाठी प्राधान्य मिळणार नाही. त्यामुळे कोणत्याही खासगी कंपनी किंवा रेल्वेने पुढाकार घेतलेला नाही. त्याऐवजी ‘क्रिस’ने पुढाकार घ्यावा, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.