हॉट संडे; मुंबईचा पारा थेट ३६.६ अंशावर !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 06:34 AM2021-11-15T06:34:59+5:302021-11-15T06:35:49+5:30
थंडीचे आगमन १५ डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात बहुतांश ठिकाणी कडाक्याच्या थंडीने जोर पकडला आहे तर दुसरीकडे मात्र मुंबईला उन्हाचे चटके बसत आहेत. रविवारी मुंबईचे कमाल तापमान थेट ३६.६ अंशांवर पोहोचले. वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांचे उकाड्याने हाल होत असून, मुंबईत थंडीला १५ डिसेंबर उजाडेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. रविवारी सर्वांत कमी तापमान जळगाव येथे १७.३ अंश नोंद झाले.
मुंबईत कधी पडणार थंडी?
n सर्वसाधारण मुंबईत थंडी नसतेच. कारण येथील हवामान दमट आहे. तरीही जेव्हा उत्तरेकडून शीत / गारे वारे दक्षिणेकडे वाहू लागतात तेव्हा राज्यात थंडीचा कडाका वाढतो. याचवेळी राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान ६ ते १० अंश असते. हा काळ डिसेंबरमध्ये नाताळच्या आसपास असतो.
n याचवेळी मुंबईतही थंडी जाणवू लागते. मुंबईतल्या थंडीचा कालावधी १५ डिसेंबर ते १५ जानेवारी असा गृहीत धरला जातो. याचवेळी मुंबईत फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन होते.
n ऊबदार वस्त्रे विकणारे ईशान्य भारतामधील विक्रेते मुंबईत दाखल होतात. रात्रीच्या प्रवासात लोकल आणि बेस्टच्या खिडक्या आपसूकच बंद होतात. लोकलमधील फॅनही बंद होतात आणि मग मुंबईकर थंडीने कुडकुडू लागतात.