हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकाना परवाना शुल्क माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:07 AM2021-03-18T04:07:01+5:302021-03-18T04:07:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे हॉटेल व्यवसायाला मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊन काळातील पालिकेचे शुल्क माफ करा, तसेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे हॉटेल व्यवसायाला मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊन काळातील पालिकेचे शुल्क माफ करा, तसेच उत्पादन परवाना शुल्क हप्त्याने भरण्याची सुविधा द्या, अशी मागणी आहारने मुख्यमंत्र्याकडे केली आहे. बुधवारी आहारच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
याबाबत आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, कोरोनामुळे हॉटेल व्यवसायाला मोठे नुकसान झाले आहे. काही हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे लॉकडाऊन काळातील पालिकेचे परवाना शुल्क माफ करा,तसेच उत्पादन परवाना शुल्क हप्त्याने भरण्याची सुविधा द्या, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागण्या मार्गी लावण्यासाठी आपण लक्ष देऊ, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या आवाहनानुसार कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या रेस्टॉरंटवर नजर ठेवण्यासाठी आहारने ४ जणांचा एक असे १० पथके तयार केली आहेत. हे पथके नियम पाळणाऱ्या रेस्टॉरंटवर लक्ष ठेवणार आहेत याबाबत माहिती मुख्यमंत्र्यांना दिली, असेही शेट्टी म्हणाले.
यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, परिवहन मंत्री अनिल परब,मागणी शिवसेना विधीमंडळ पक्ष मुख्य प्रतोद,आमदार सुनील प्रभू ,प्रधान सचिव वळसा नायर आदी उपस्थित होते.