मुंबई : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये भाजी- भाकरी करण्यासाठी जाणाऱ्या महिलांचा रोजगार थांबला आहे. हाताला कामच नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकडा १२ हजारांपर्यंत आला आहे. त्यामुळे
सोमवारी ८ वाजेपासून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत, तर शनिवारी, रविवारी लॉकडाऊन असणार आहे. आठ दिवसांपासून हॉटेल व्यवसाय ठप्प आहे. आताही केवळ पार्सल देण्यासाठीच परवानगी दिली आहे. प्रत्येक हॉटेलमध्ये सर्व पदार्थ बनविण्यासाठी कूक असले, तरी पोळी किंवा भाकरी करण्यासाठी महिला कामगार असतात. आता पार्सल सुविधा असल्याने हॉटेलमधील कर्मचारी संख्याही कमी करण्यात आली आहे. कर्मचारी कपातीची कुऱ्हाड महिला कामगारांवर पडली असून, अनेक महिला कामगारांचा रोजगार गेला आहे. महिनाभरापासून हाताला कामच नसल्याने कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न निर्माण होत आहे. घरभाडे, किराणा सामान, गॅस कसा खरेदी करायचा, याची चिंता आहे.
- शहरातील हॉटेलची संख्या- २२,०००
हॉटेलमध्ये पोळी-भाजी करणाऱ्या महिलांची संख्या- १,०००
हॉटेल बंद असल्याने हातचा रोजगार गेला आहे. दुसरे कामही मिळत नाही. कामच नसल्याने घरभाडे थकले आहे. घरात गॅस नाही, किराणा नाही. त्यामुळे दिवस कसा ढकलावा, हाच प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने हॉटेलवर काम करणाऱ्या महिलांना मदत केली पाहिजे.
-सुमन वाकचौरे
हॉटेल बंद असल्याने हातचे काम गेले आहे. दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करावीत, तर कोरोनामुळे तेही काम काेणी देत नाही. हाताला कामच नसल्याने कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. शासनाने हाताला किमान काम तरी उपलब्ध करून द्यावे.
-उषा झरेकर
हॉटेलमध्ये भाजी-भाकरीचे काम करीत असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला होता. कोरोनामुळे हॉटेल बंद ठेवावे लागत असल्याने तेही काम गेले आहे. कामच नसल्याने हाती पैसाही राहत नाही. त्यामुळे लहान मुलांना जगवायचे कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
-लतिका काळे
वर्ष कसे काढले, आम्हालाच ठाऊक!
आठ दिवसांपासून हॉटेल व्यवसाय ठप्प असला, तरी मागील वर्षभरापासून अशीच स्थिती आहे. हॉटेल कामगारांना तर वर्षभरापासून विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात महिला कामगारांना वर्षापासून काम मिळत नसल्याने वर्ष कसे काढले, आमचे आम्हालाच ठाऊक, अशी प्रतिक्रिया पोळी-भाजी बनविणाऱ्या महिला कामगाराने दिली. हॉटेल मालकांना दया आल्याने त्यांनी आमच्या पोटापाण्याची सोय केल्याने कसे तरी वर्ष ढकलल्याचे ही महिला कामगार म्हणाली.