लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालदीवमध्ये हॉटेल बुकिंग करणे घाटकोपरच्या एका जोडप्याला भलतेच महागात पडले आहे. हाॅटेल, रिसाॅर्टमध्ये राहाण्याची व्यवस्था करून देण्यासाठी दाम्पत्याकडून पैसे घेत ट्रॅव्हल एजंटने त्यांची दोन लाखांना फसवणूक केली आहे. अभिषेक कोतवाल असे आरोपी ट्रॅव्हल एजंटचे नाव असून, त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवत, पंतनगर पोलिस अधिक तपास करत आहे.
घाटकोपर परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय इंटेरिअर डिझायनर तरुणाला गेल्यावर्षी २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत पत्नीसोबत मालदीवला फिरायला जायचे होते. यासाठी त्याने ट्रॅव्हल एजंट कोतवाल याला संपर्क केला.
कोतवाल याच्या सांगण्यावरून या तरुणाने त्याला एकूण एक लाख ९१ हजार ३४४ रुपये पाठविले. कोतवाल याने मालदीवमधील सन आयलँड रिसार्ट ॲण्ड स्पा येथे बुकिंग केल्याचे सांगितले. त्याने फक्त तरुणाच्या नावाने बुकिंग केली. पण, पैसे भरले नाहीत. कोतवाल याने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच तरुणाने त्याच्याकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. त्याने, फक्त ७१ हजार रुपये परत केले. उर्वरित रक्कम न दिल्याने तरुणाने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.