बिल न भरल्याने हॉटेल ग्राहक अटकेत
By admin | Published: June 17, 2017 02:23 AM2017-06-17T02:23:21+5:302017-06-17T02:23:21+5:30
दक्षिण मुंबईतील हॉटेल ताजमध्ये वास्तव्य केलेल्या ग्राहकाने ५० हजारांचे बिल न देताच पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून कफ परेड
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दक्षिण मुंबईतील हॉटेल ताजमध्ये वास्तव्य केलेल्या ग्राहकाने ५० हजारांचे बिल न देताच पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून कफ परेड पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याची अधिक चौकशी सुरू आहे.
तामिळनाडू येथील तुतूकुडी येथे राहणारा भीमसेंट जॉन (६१) या आरोपीने सेंट्रल रिझर्व्हेशनच्या माध्यमातून ताज विवांता येथे काही दिवसांपूर्वी एक रूम बुक केली. दोन दिवस या ठिकणी राहिल्यानंतर त्याने येथील अनेक सुविधांचा लाभ घेतला. त्यामुळे त्याचे बिल ५० हजार रुपये झाले होते. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे या पैशाची मागणी केली असता आपला एक मित्र पैसे घेऊन येणार असल्याचे त्याने येथील कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र त्याचा कोणीही मित्र या ठिकाणी आला नाही. त्यानंतर तो येथील कर्मचाऱ्यांना गुंगारा देत पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र याच वेळी कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून कफ परेड पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी तत्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. सदर आरोपी हा २०१४मध्येही अशाच पद्धतीने हॉटेलमध्ये आला होता. तेव्हा तो पळून गेला होता. त्यामुळे तेव्हादेखील त्याच्यावर कफ परेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या आरोपीने अशाच प्रकारे अनेक हॉटेलना गंडा घातला असावा, असा संशय पोलिसांना आहे.
- आरोपी भीमसेंट जॉन हा २०१४मध्येदेखील अशाच पद्धतीने हॉटेलमध्ये आला होता. तेव्हा तो पळून गेला होता. त्यामुळे तेव्हादेखील त्याच्यावर कफ परेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.