Join us

हॉटेल संघटनांची मुंबईत निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:07 AM

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाच्या वतीने कठोर निर्बंध घातले असून, मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली ...

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाच्या वतीने कठोर निर्बंध घातले असून, मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या निर्बंधांमुळे रेस्टॉरंटचालकांचे मोठे नुकसान होत असल्याचे रेस्टॉरंट मालकांचे म्हणणे आहे. याच निर्बंधांच्या विरोधात गुरुवारी विविध हॉटेल रेस्टॉरंट संघटनांनी एकत्र येत मुंबईत हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या बाहेर निदर्शने केली. एफएचआरआय, एचआरएडब्ल्यूआय, एनआरएआय, आहार या संघटनांनी युनायटेड हॉस्पिटॅलिटी फोरम ऑफ महाराष्ट्रच्या वतीने राज्यात १२.३० वाजता हातात फलक घेऊन व सोशल डिस्टन्सिंग पाळून शांततेत निदर्शने केली.

मागील वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हॉटेल व रेस्टॉरंट‌्स व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते. त्यातून कुठे आता सर्व व्यावसायिक सावरत असताना पुन्हा एकदा शासनाच्या वतीने कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. लॉकडाऊनमध्ये सरकारकडून आम्हाला कोणताच दिलासा मिळत नाही. हॉटेल व्यवसायावर लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.