Join us  

हॉटेल मालकांना गंडा घालणाऱ्यांचा पर्दाफाश

By admin | Published: October 24, 2015 2:44 AM

मुंबईकरांचा डेबिट आणि क्रेडिट कार्डचा डाटा चोरी करणाऱ्या रोमानियन टोळीच्या अटकेपाठोपाठ बनावट क्रेडिट कार्डद्वारे पंचतारांकित हॉटेल मालकांना गंडा घालणाऱ्या दिल्लीतील

- मनीषा म्हात्रे,  मुंबईमुंबईकरांचा डेबिट आणि क्रेडिट कार्डचा डाटा चोरी करणाऱ्या रोमानियन टोळीच्या अटकेपाठोपाठ बनावट क्रेडिट कार्डद्वारे पंचतारांकित हॉटेल मालकांना गंडा घालणाऱ्या दिल्लीतील त्रिकुटाला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धार्थ कपूर उर्फ अरुण चंद्रप्रकाश कंथुरिया (२६), विजय कुमार मल्होत्रा उर्फ प्रिन्स दीपक धिंगरा (२१), रोहक दहिचा उर्फ विकास विजेंदरसिंग चिक्कारा (२६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.वरळी येथील फोर सिझन या पंचताराकित हॉटेलमध्ये २७ आॅगस्ट रोजी या त्रिकुटाने दोन रुम बुक केले होते. दिल्लीतील व्यवसायिक असल्याची बतावणी केल्याने हॉटेल मालक त्यांच्या जाळ्यात अडकला. तब्बल ११ दिवस त्यांनी हॉटेलमध्ये ऐशोआराम केला. ६ सप्टेंबर रोजी हॉटेलकडून त्यांना ४ लाख ७ हजार ९७२ रुपयांचे बिल थोपवण्यात आले. तेव्हा या त्रिकुटाने बनावट क्रेडिट कार्डच्या आधारे पेमेंट करुन पळ काढला. संबंधित बँकेकडून ते कार्ड फेक असल्याचे समजताच हॉटेल मालकाला डोक्याला हात मारण्याची वेळ आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वरळी पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. मात्र हॉटेलमध्ये या त्रिकुटाने स्वत:ची खोटी माहिती दिल्याने याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान बनले होते. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हे त्रिकुट दिल्ली येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री दिल्लीतून या त्रिकुटाला अटक करण्यास वरळी पोलिसांना यश आले. अटक आरोपी हे शिक्षित असून यातील दोघे एमबीए तर एकाने एमएची पदवी घेतलेली आहे. यातील रोहक नावाचा आरोपीहिरे व्यापारी असल्याचे सांगत आहे. दिल्लीमध्ये त्याचे दुकान असून ते तोट्यामुळे बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त एस. जयकुमार यांनी दिली. या त्रिकुटाविरोधात जुहू पोलीस ठाण्यात अशाप्रकारे फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी हे बनावट क्रेडिट कार्ड कसे बनविले? यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत.