मुंबई : नाइटलाइफ अंतर्गत रात्री १०नंतर मुंबईच्या रस्त्यावर फूड ट्रक उभा करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. याबाबतचे धोरण तयार करण्यात आले आहे. मात्र अशा फूड ट्रकमुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम होईल, अशी धास्ती हॉटेल मालकांना वाटत आहे. त्यामुळे हॉटेल मालकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पालिका आयुक्त यांची भेट घेऊन या धोरणाला आपला विरोध दर्शविला.पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत प्रजासत्ताक दिनापासून नाइटलाइफ सुरू झाले आहे. याअंतर्गत मुंबईतील मॉल्स, दुकाने, हॉटेल्स २४ तास सुरू राहणार आहेत. याअंतर्गत परदेशात दिसून येणारी फूड ट्रक ही खाद्य संस्कृती रुजणार आहे. फूड ट्रकला परवानगी देणारे धोरण पालिका प्रशासनाने तयार केले आहे. त्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फूड ट्रक रस्त्यावर उभे करून व्यवसाय करता येणार आहे.मात्र या धोरणामुळे हॉटेल मालकांचे धाबे दणाणले आहे. आॅल इंडिया हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन (आहार) शिष्टमंडळाने नुकतीच आयुक्त प्रवीण परदेशी यांची पालिका मुख्यालयात भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. हे धोरण म्हणजे फेरीवाल्यांना मागच्या दाराने पुन्हा प्रवेश देण्यासारखे आहे, अशी नाराजी या शिष्टमंडळाने व्यक्त केली.फूड ट्रकचे नियम...1प्रत्येक फूड ट्रकला रस्त्यावर केवळ चार फोल्डिंग टेबल मांडण्याची(१६ आसन व्यवस्था) परवानगी असेल.2दोन फूड ट्रकमध्ये २० मीटरचे अंतर असणे बंधनकारक आहे.3हे फूड ट्रक खाजगी अथवा सार्वजनिक वाहनतळावर उभे करण्यात यावेत.4पदपथ ब्लॉक न करता केवळ ४० टक्के जागेवरच टेबलची मांडणी असावी.5ग्राहकांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला असावा(बी ग्रेड) तसेच व्यवसाय झाल्यानंतर त्या परिसराची स्वच्छता ठेवावी.6आसपासच्या परिसराला त्रास होईल असा कोणताही आवाज तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवू नयेत.
फूड ट्रकमुळे धास्तावले हॉटेलचे मालक, पालिकेच्या धोरणाला केला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 4:23 AM