जुलैमध्ये होणार हॉटेल, रेस्टॉरंट सुरू - आहार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 06:20 AM2020-06-06T06:20:55+5:302020-06-06T06:21:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे राज्यातील हॉटेल व्यवसायातील ८५ ते ९० टक्के कर्मचारी आपापल्या राज्यांत, मूळगावी परत गेले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे राज्यातील हॉटेल व्यवसायातील ८५ ते ९० टक्के कर्मचारी आपापल्या राज्यांत, मूळगावी परत गेले आहेत. त्यामुळे ते परत येईपर्यंत व यासंदर्भातील अन्य व्यवस्था पूर्ण होण्यास वेळ लागेल. त्यामुळे आता जुलैमध्येच हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करता येतील, असे आहार या संघटनेने स्पष्ट केले.
हॉटेल, रेस्टॉरंटमधील बरेच कर्मचारी मूळ गावी गेले आहेत. ज्या हॉटेलमध्ये १०० कर्मचारी काम करीत होते तेथे सध्या १० कर्मचारीही नाहीत. हॉटेल सुरू करायचे असेल तर पुरेशे मनुष्यबळ आवश्यक असते, त्यामुळे सध्या हॉटेलमध्ये जेवण सुरू करणे शक्य नाही. सरकारने परवानगी दिली तरी कर्मचाऱ्यांना परत आणण्यासाठी व्यवस्था करायला हवी. त्यानंतर क्वारंटाइनमध्ये त्यांचे काही दिवस जातील. तोपर्यंत जुलै उजाडेल, असे आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले.
कर्मचारी, ग्राहकांचे तापमान पाहणे, सॅनिटायझर देणे या गोष्टी पाळता येतील. पण १२ बाय १० ची काही लहान हॉटेल्स आहेत. त्या ठिकाणी सहा फुटांचे अंतर कसे ठेवणार, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.
राज्यभरात सद्यस्थितीत दीड हजार पोलीस कोरोनावर उपचार घेत आहेत. यातच, शुक्रवारपासून बाजारपेठा, दुकाने काही अटी- शर्तींवर सुरू झाल्याने या नियमांचे पालन होतेय की नाही, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिसांवरचा ताण वाढल्याचे पाहायला मिळाले.
विविध भागात शुक्रवारी सकाळपासूनच रूट मार्चद्वारे नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. मुलुंड, ऐरोली, आनंदनगर, दहिसरसह विविध टोल नाक्यांसह समुद्र किनारी पोलिसांचा विशेष बंदोबस्त होता. विशेषत: प्रतिबंधित क्षेत्राबाहेर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. रस्त्यावरील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढू शकते. त्यामुळे विशेषत: सोनसाखळी चोरांपासून सावध राहण्याच्या सूचनाही पोलिसांनी केल्या.