हाॅटेल कर्मचारी गिरवणार अन्न सुरक्षेचे धडे; सर्वसामान्यांना भेसळमुक्त अन्न देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:04 AM2023-12-22T10:04:49+5:302023-12-22T10:04:58+5:30
अन्न सुरक्षा कायद्यान्वये प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, भेसळमुक्त खाद्यान्न मिळावे हा त्यांचा हक्क आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहर उपनगरातील प्रत्येक गल्लोगल्लीतील वडापाव, पाणीपुरी ते चायनीजच्या हातगाडीपर्यंत आणि छोट्या हॉटेलपासून स्टार हॉटेलमधील वेटर, आचाऱ्यांपर्यंत सर्व विक्रेत्यांना अन्न सुरक्षेचे धडे देण्यात येणार आहेत. नुकत्याच अन्न व औषध प्रशासनाने राबविलेल्या हाॅटेल तपासणीच्या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्यांना भेसळमुक्त अन्न देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे.
अन्न सुरक्षा कायद्यान्वये प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, भेसळमुक्त खाद्यान्न मिळावे हा त्यांचा हक्क आहे. त्याकरिता एफडीएने शहरात हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह मोठ्या पंचतारांकित हॉटेलमधील कर्मचाऱ्यांपर्यंत अन्न सुरक्षेचा मंत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात हॉटेल मॅनेजमेंट संस्था आणि संघटनांचे सहकार्य घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, नव्या वर्षात मुंबई शहर उपनगरांतील टप्प्याटप्प्यांने विक्रेत्यांना सुरक्षित अन्नाविषयी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाईल. त्याशिवाय अन्न सुरक्षेची जनजागृती केली जाणार आहे.
काय धडे देणार?
हातगाडीवर पदार्थ तयार करताना विक्रेत्याने ॲप्रन, हॅण्ड ग्लोव्हज, हेडकॅप वापरणे, स्वच्छता राखणे, कचराकुंड्या झाकणे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. त्याशिवाय खाद्यपदार्थांचे कच्चे साहित्य खरेदीपासून ते तयार करणे, साठवणूक प्रक्रिया, खाद्यतेलाचा वापर आणि अन्नपदार्थ ग्राहकांसमोर देण्यापर्यंत कशी आणि कोणती काळजी घ्यावी याचेही प्रशिक्षण हातगाडी विक्रेत्यांना दिले जाईल.
पहिल्या टप्प्यानंतर स्वयंपाकगृहामधील आचारी, तसेच मॅनेजर, हॉटेल मालकांनाही टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे.
वडापाव, पाणीपुरी, अंडाभुर्जी पाव, चायनीज यासारख्या हातगाडीवर विकल्या जाणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांचे विक्रेत्यांना अन्न सुरक्षेचे पहिल्या टप्प्यात धडे दिले जाणार आहेत, अशी माहिती ‘एफडीए’च्या अन्न विभागाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली.