हॉटेल कर्मचारी गिरवणार अन्न सुरक्षेचे धडे; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

By स्नेहा मोरे | Published: December 21, 2023 07:53 PM2023-12-21T19:53:19+5:302023-12-21T19:53:35+5:30

अन्न सुरक्षा कायद्यान्वये प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, भेसळमुक्त खाद्यान्न मिळावे हा त्यांचा हक्क आहे.

Hotel staff to teach food safety lessons Food and Drug Administration Decision | हॉटेल कर्मचारी गिरवणार अन्न सुरक्षेचे धडे; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

हॉटेल कर्मचारी गिरवणार अन्न सुरक्षेचे धडे; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

मुंबई - शहर उपनगरातील प्रत्येक गल्लोगल्लीतील वडापाव, पाणीपुरी ते चायनीजच्या हातगाडीपर्यंत आणि छोट्या हॉटेलपासून स्टार हॉटेलमधील वेटर, आचाऱ्यांपर्यंत सर्व विक्रेत्यांना अन्न सुरक्षेचे धडे देण्यात येणार आहेत. नुकत्याच अन्न व औषध प्रशासनाने राबविवेल्या हाॅटेल तपासणीच्या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्यांना भेसळमुक्त अन्न देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे.

अन्न सुरक्षा कायद्यान्वये प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, भेसळमुक्त खाद्यान्न मिळावे हा त्यांचा हक्क आहे. त्या करिता एफडीएने शहरात हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह मोठ्या पंचतारांकित हॉटेलमधील कर्मचाऱ्यांपर्यंत अन्न सुरक्षेचा मंत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात हॉटेल मॅनेजमेंट संस्था आणि संघटनांचे सहकार्य घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार , नव्या वर्षात मुंबई शहर उपनगरातील टप्प्याटप्प्याने विक्रेत्यांना सुरक्षित अन्नाविषयी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाईल. त्याशिवाय अन्न सुरक्षेची जनजागृती केली जाणार आहे. वडापाव, पाणीपुरी, अंडा भुर्जी पाव, चायनीज यासारख्या हातगाडीवर विकल्या जाणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांचे विक्रेत्यांना अन्न सुरक्षेचे पहिल्या टप्प्यात धडे दिले जाणार आहेत,’ अशी माहिती ‘एफडीए’च्या अन्न विभागाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली आहे. अन्न सुरक्षा कायद्यान्वये प्रत्येक नागरिकाला सुरक्षित अन्न मिळण्याचा अधिकार आहे. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या संकल्पनेनुसार ‘सेफ फूड’ ही संकल्पना राबविण्यासाठी एफडीएकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.

शहरातील गल्लोगल्ली दिवसागणिक अन्न पदार्थ विक्रेत्यांची रेलचेल वाढत आहे. तसेच, दुसरीकडे बाहेरील अन्न पदार्थांचे सेवनही वाढल्याने आता अन्न सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विक्रेत्यांना मूलभूत नियमांपासून काही गोष्टी आवर्जून शिकविण्यात येणार आहेत. त्यात मग हातगाडीवर पदार्थ तयार करताना विक्रेत्याने अॅप्रॉन वापरणे, हॅण्ड ग्लोव्हज वापरणे, हेडकॅप वापरणे, स्वच्छता राखणे, कचराकुंड्या झाकणे याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. त्याशिवाय खाद्यपदार्थांचे कच्चे साहित्य खरेदीपासून ते तयार करणे, साठवणूक प्रक्रिया, खाद्यतेलाचा वापर आणि अन्न पदार्थ ग्राहकांसमोर देण्यापर्यंत कशी आणि कोणती काळजी घ्यावी याचेही प्रशिक्षण हातगाडी विक्रेत्यांना देणार आहोत, असेही आढाव यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यानंतर स्वयंपाकगृहामधील आचारी, तसेच मॅनेजर, हॉटेल मालकांना देखील टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे.

Web Title: Hotel staff to teach food safety lessons Food and Drug Administration Decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.