Join us

आर्थिक नुकसानीमुळे हॉटेलचालक तणावाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:06 AM

मुंबई : काही दिवसांपूर्वी आर्थिक नुकसानामुळे विरार येथील हॉटेलचालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. हॉटेलचालकाला कर्जदारांकडून तगादा लावला जात ...

मुंबई : काही दिवसांपूर्वी आर्थिक नुकसानामुळे विरार येथील हॉटेलचालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. हॉटेलचालकाला कर्जदारांकडून तगादा लावला जात होता, त्यामुळे त्याला कंटाळून जीवन संपवावे लागले. आर्थिक तोट्यामुळे हॉटेल चालकांना मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. हॉटेल व रेस्टॉरंटवरील निर्बंध पूर्ण शिथिल करा किंवा मालकांना विविध शुल्कांमध्ये सवलत द्या, असे हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने सांगितले.

हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष शेरी भाटिया म्हणाले, हॉटेल उद्योग अतिशय कठीण टप्प्यातून जात आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना व्यवसायात तोटा, पगार देणे, मालमत्तेची देखभाल करणे आणि भाड्याचे अतिरिक्त भार, परवाना फी, कर, वैधानिक शुल्क, युटिलिटी बिल यांसारख्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना मानसिक ताण येऊ शकतो आणि परिणामी अशा परिस्थितीत असे कठोर निर्णय घेण्यास भाग पडतात. परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वी सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा.

काय आहे मागणी?

ज्या शहरांत व जिल्ह्यांत फारच कमी कोरोना केसेस आहेत त्या ठिकाणी निर्बंध न लावता रेस्टॉरंट्स चालविण्यासाठी वेळ आणि प्रोटोकॉलमध्ये बदल करण्यात यावा. १ किंवा २ लेव्हल अंतर्गत येणाऱ्या रेस्टॉरंट्सना संबंधित परवान्याअंतर्गत परवानगी मिळालेल्या वेळेनुसार, शनिवार आणि रविवारसह आठवड्यात रोज सकाळी ७ ते रात्री १२.३० दरम्यान चालू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने केली आहे.

हॉटेल मालकाने व्यवसायात होणाऱ्या नुकसानीमुळे आयुष्य संपविण्याची घटना सरकारसाठीही धोक्याची सूचना आहे. कोरोना महामारीनंतर झालेल्या नुकसानीसाठी परवाना शुल्क आणि इतर वैधानिक शुल्काच्या संदर्भात उद्योगाला आर्थिक सवलत मिळणे आवश्यक आहे. व्यवसाय मालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सरकारने हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना आणि त्यावर अवलंबून असलेल्या इतरांना उपजीविकेसाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट खुले ठेवण्याची परवानगी द्यावी.

प्रदीप शेट्टी, वरिष्ठ उपाध्यक्ष, हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया