मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकावरील लिंबू सरबतवाल्याचं बिंग वायरल झालेल्या व्हिडिओनंतर फुटले. त्यांनतर आता घाटकोपर पश्चिमेकडील एका हॉटेलच्या छतावरील पाण्याच्या टाकीवर आंघोळ करतानाचा व्हिडीओ वायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांच्या आरोग्यास घातक अन्न - पदार्थ पुरविणाऱ्या हॉटेलबाबत चर्चा सुरु झाली आहे.
कुर्ला रेल्वे स्थानकावरच्या कामगाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता. यामध्ये अत्यंत घाणेरड्या पद्दतीने तो लिंबू सरबत तयार करत होता. सुज्ञ नागरिक असलेल्या सिद्धेश पावले या तरुणाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने व्हिडीओ बनवला. रेल्वे प्रशासनाकडे त्याची तक्रार केल्यानंतर त्यांनी स्टॉलमालकावर कारवाई करत तो स्टॉल बंद केला आणि स्टॉलमालकाला ५ लाखांचा दंड ठोठावला. अशातच आता मुंबईमधील घाटकोपर पश्चिमेकडील अभिनंदन हॉटेलच्या छतावरील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडिओत हॉटेलच्या छतावर असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर आंघोळ करताना एक मुलगा दिसत आहे आणि तेच अंघोळीचे पाणी पुन्हा पाण्याच्या टाकीत पडत आहे. तसेच त्याच पाण्याचा हॉटेलमधल्या जेवणासाठी वापर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओच्या चौकशीची मागणी केली आहे.