हॉटस्पॉट भायखळा, वडाळा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 01:44 AM2020-06-07T01:44:16+5:302020-06-07T01:44:29+5:30
दैनंदिन रुग्णवाढ सर्वात कमी । प्रादुर्भाव रोखण्यात महापालिकेला यश
मुंबई : देशात रुग्ण सरासरी १६ दिवसांमध्ये दुप्पट होत असताना मुंबईत मात्र हे प्रमाण २० दिवसांवर आणण्यात महापालिकेला यश आले आहे. एवढेच नव्हे तर कोरोनाबाधित हॉटस्पॉटच्या यादीत टॉपला असलेल्या भायखळा, नागपाडा आणि वडाळा, सायन या विभागांत आता दररोज रुग्ण वाढण्याचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे केवळ १.५ आणि १.७ टक्के एवढे आहे. या विभागांमध्ये ४२ दिवसांनंतर रुग्णसंख्या दुप्पट झाल्याचे आढळून आले आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर ई विभाग (मुंबई सेंट्रल, भायखळा, नागपाडा, कामाठीपुरा) येथे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. याप्रकरणी ई विभागाच्या सहायक आयुक्तांची तडकाफडकी बदलीही करण्यात आली होती. तर एफ उत्तर म्हणजे सायन, माटुंगा, वडाळा, अँटॉप हिल परिसरात हीच परिस्थिती होती. २४ मेपर्यंत मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ११ दिवसांवर होते. आठ सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर या विभागांमधील कार्यपद्धतीत बदल केले़
दाट लोकवस्तीमुळे वाढले आव्हान
च्दाट लोकवस्ती असलेल्या विभागांमध्ये सोशल डिस्टन्स पाळणे अवघड असल्याने रुग्णसंख्या वाढत गेल्याचे दिसून येते. भायखळा, आग्रीपाडा, नागपाडा हा परिसर यापैकीच एक. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त १५ लोकांना क्वारंटाइन करण्यात येऊ लागले.
च्तसेच संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण, लोकांना रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याच्या गोळ्या देण्यात आल्या. परिणामी या विभागात आता रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ४२ दिवसांवर आले आहे.
च्एफ-उत्तर विभागातील माटुंगा, शीव, वडाळा, अँटॉप हिल परिसरातही आता रुग्णसंख्या ३२ दिवसांनी दुप्पट होत आहे.
च्येथे १८३ इमारती आणि २२ बाधित क्षेत्र आहेत. आतापर्यंत १३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
या उपाययोजनांना यश
च्ई विभागात ९९ इमारती आणि २२ बाधित क्षेत्र आहेत. तर दहा शाळांमध्ये क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये लक्षणे नसलेल्या दोन हजार संशयितांना ठेवण्याची व्यवस्था आहे. सध्या येथे १५०० लोक क्वारंटाइन आहेत.
च्एफ-उत्तर विभागातील माटुंगा, शीव, वडाळा, अँटॉप हिल परिसरात लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठीच्या कोरोना केअर सेंटरमध्ये १२५० संशयित क्वारंटाइन आले आहेत. तर सीसीसी-२ मध्ये ४०० रुग्ण आहेत.
च्भायखळा येथील रिचर्डसन क्रुड्स येथे एक हजार खाटांचे कोरोना हेल्थ सेंटर उभारण्यात येत आहे. या ठिकाणी आॅक्सिजनची सुविधा असलेल्या ३०० खाटा आहेत. १५ जूनपासून हे केंद्र सुरू होणार आहे.