मनोहर कुंभेजकर
मुंबई : कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून वरळी,धारावी ओळखला जात होता. मात्र याभागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तर दुसरीकडे उत्तर मुंबईच्या कांदिवली ते दहिसर याभागात मोडणाऱ्या पालिकेच्या परिमंडळ 7 मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे.या भागात स्लमची संख्या जास्त असली तरी आता येथील इमारतींमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची चेस द व्हायरस ही संकल्पना परिमंडळ 7 मध्ये युद्धपातळीवर राबवण्यास सुरवात केली आहे. पालिकेचे परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी लोकमतला ही माहिती दिली.
परिमंडळ 7 मध्ये आर दक्षिण,आर मध्य व आर उत्तर हे तीन वॉर्ड मोडतात.आर दक्षिण वॉर्ड ( कांदिवली) मध्ये आता पर्यंत 1965 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 730 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 1120 रुग्ण स्लम मध्ये तर 845 रुग्ण इमारतींमध्ये आढळून आले.आर मध्य वॉर्ड(बोरिवली) येथे आता पर्यंत 1781 कोरोना रुग्ण आढळून आले असून 766 रुग्ण कोरोना मुक्त झाले,तर स्लम मध्ये 444 तर येथील इमारतींमध्ये 1337 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.आर उत्तर वॉर्ड( दहिसर) येथे एकूण 1207 कोरोना रुग्ण आढळून आले असून,443 रुग्ण करोनामुक्त झाले आहे.तर येथील स्लम मध्ये 649 तर इमारतींमध्ये 558 कोरोना रुग्ण आढळून आले आहे.परिमंडळ 7 मध्ये कोरोना रुग्णांची संख्या 4953 असून 1939 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर 322 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला.तर सध्या 2692 पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण असून स्लम मध्ये 2213 तर इमारतींमध्ये 2740 कोरोना रुग्ण आहेत.
येथील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पालिका प्रशासन व येथील पोलिस सहआयुक्तांची नुकतीच संयुक्त बैठक झाली. पालिकेला पोलिस प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळत आहे. येथील 939 इमारतीमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्याने त्या सील करण्यात आल्या आहेत,तर 113 स्लम मध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने त्याठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू केला आहे. तसेच येथील एसआरए बिल्डिंग मध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यास या इमारती सील करण्यात येनार आहेत. तसेच सील केलेल्या भागातील जाणारे तीन चार रस्ते जर असतील तर तीन रस्ते बंद करण्यात आले असून,एक रस्ता नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना अत्यावश्यक सेवा मिळण्यासाठी सुरू ठेवण्यात आल्याची माहिती शंकरवार यांनी दिली.
पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शखाली येथील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरवात केली आहे. येथील स्लमच्या शौचालयांमधे पूर्वी दिवसातून तीन वेळा सॅनिटायझेशन होत होते.आता दिवसातून सहा वेळा करण्यात येत आहे कम्युनिटी हेल्थ वर्कर्सना इन्सेटिव्ह देऊन आजारी रुग्णाच्या सर्वेक्षणचे काम दोन शिफ्ट मध्ये करण्यात येणार आहे तसेच येथील इमारतींमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता उद्या पासून येथील ज्या सोसायटीत रूग्ण वाढतहेत अशा सोसाइटी त जाऊन येथील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. पालिकेच्या समवेत बीजेएस जैन संस्था व क्रीडाई यांच्यावतीने मोबाइल व्हॅन दाखल होत आहे. या व्हॅन सोबत डॉक्टर व कोरोनाची टेस्टिंग करणारा लॅबोरेटरीचा कर्मचारी असेल. ज्याना कोरोनाची लक्षणे आसतील अशा नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोणत्या दिवशी कोणत्या सोसायटीत आमचे पथक येणार याची माहिती आधी त्या सोसायटीला देण्यात येईल, अशी माहिती शेवटी विश्वास शंकरवार यांनी दिली.