भुकेल्यांसाठी मदतीचा हात तर एका तासांत दिले २५ जणांनी दिले २५ हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 05:41 PM2020-04-17T17:41:09+5:302020-04-17T17:42:15+5:30
कोरोनाला थोपविण्यासाठी लॉक डाऊनाचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र या काळात ज्यांचे पोट हातावर आहे; त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मुंबई : कोरोनाला थोपविण्यासाठी लॉक डाऊनाचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र या काळात ज्यांचे पोट हातावर आहे; त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी अशा लोकांना मदत करण्यासाठी अनेक संस्था पुढे सरसावल्या आहेत. यापैकीच आश्रय फाऊंडेशनकडून नुकतेच सायन प्रतीक्षा नगर येथे अन्नाचे वाटप करण्यात आले. दुसरीकडे राज्याला अखंडीत वीज पुरवठा करत असलेल्या महावितरणच्या वाशी मंडळातील कर्मचारी वर्गानेही मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी मदत गोळा केली असून, याद्वारे २५ कर्मचा-यांनी एका तासांत २५ हजार रुपये जमा केले आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने लॉककडाऊनचा निर्णय घेतला. यामुळे हातावरचे पोट असणारे कामगार, श्रमिक, बेघरांचे अतोनात हाल झाले. हाताला काम नसल्याने व दुकानावर वाण सामान मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आली. प्रतीक्षा नगर सायन कोळीवाडा येथील आश्रय फाऊंडेशन नेहमीच सामाजिक कार्यात सामान्यांना आरोग्य शिबीर, शैक्षणिक मदत, अतिमूसळधार पावसाळ्यात अडकलेल्या नागरिकांना मदत, पोलीस कर्मचारीचे आरोग्य तपासणीआदी स्वरूपात करण्यात नेहमीच पुढाकार घेत आलेले आहे. प्रतिक्षा नगरमधील म्हाडा संक्रमण शिबिराच्या इमारतीचे काम सुरु असून, हे इमारत बांधकाम कामगार आज लॉक डाऊनच्या काळात रोजगार नसल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. प्रतिक्षा नगरमधील आजूबाजूच्या झोपडपट्टीतील गरजू नागरिक, हौसिंग सोसायटी साफ करणारे सफाई कामगार अनेक गरजू नागरिक अशा ४०० लोकांची दररोज लॉक डाऊनच्या काळात सकाळी ११ ते २ आणि संध्याकाळी ७ ते १० या दोन्ही वेळेसाठी जेवणाची सोय करण्यात येत आहे. लॉक डाउनच्या काळात सरकारकडून मोफत धान्य देण्यास फारच विलंब लागत असल्याने त्यात कामगार वर्गाकडे रेशनकार्ड नसल्याने आणि हाती पैसा नसल्याने उपासमारीच्या काळात अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येऊन गरिबांना मदतीचा हात देताना दिसत आहेत. फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन क्षिरसागर यांनी सांगितले की पहिल्या टप्प्यातील लॉक डाऊनमध्ये आम्ही गरिबांची सेवा केलीच आहे. आता पुढील लॉक डाऊनच्या काळात पण अन्नछत्र चालून ठेवून भुकेल्यांची भूक भागविणार आहे.
--------------------------
- संपूर्ण भारत देश आज कोरोना संसर्गाशी लढत आहे.
- देशात संचारबंदी लागू असल्यामुळे उद्योग-धंदे बंद असून गोर-गरिबांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
- यावेळी, राज्यात अनेक जण पुढे येऊन मुख्यमंत्री निधीत मदत करत असून आपली सामाजिक बांधिलकी म्हणून महावितरणच्या विविध कार्यालयातून अन्न-दानाचे वाटप करण्यात येत आहे.
- यात महावितरणच्या वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता आर.बी. माने यांनी त्यांच्या मंडळ कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना पिडीत रूग्णांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्य निधीत काही रक्कम जमा करण्याबाबत आवाहन केले होते.
- त्यांनी आवाहन करताच, अवघ्या एक तासात वाशी मंडळातील २५ कर्मचा-यांकडून २५ हजार रुपये जमा करण्यात आले.
- या महत्वाचा कामासाठी वाशी मंडळचे वरिष्ठ व्यवस्थापक, दिलीप तेले यांनी प्रामुख्याने पुढाकार घेतला आहे.
- सदर निधी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्वनिधीतून जमा करून दिला आहे. कर्मचाऱ्यांचा तात्काळ प्रतिसाद बघून, भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी त्यांचे कौतुक केले.