Join us

एलबीएसची कोंडी फुटेना : वीस मिनिटांच्या प्रवासाला एक तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 2:43 AM

मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील सायन ते घाटकोपरदरम्यानच्या पट्ट्यात होणारी वाहतूककोंडी दिवसागणिक वाढत आहे.

मुंबई : मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील सायन ते घाटकोपरदरम्यानच्या पट्ट्यात होणारी वाहतूककोंडी दिवसागणिक वाढत आहे. विशेषत: म्हणजे रस्त्यालगत अनधिकृतरीत्या उभ्या करण्यात आलेल्या वाहनांसह रस्त्यालगत सुरू असलेल्या कामादरम्यानचे शून्य नियोजन येथील वाहतूककोंडीस कारणीभूत आहे. परिणामी, वाहतूक पोलीस आणि महापालिकेकडून याबाबतची कार्यवाही कधी केली जाणार, असा सवाल स्थानिकांसह वाहनचालक आणि पादचारी वर्गाकडून केला जात आहे. दरम्यान, या सर्व समस्यांमुळे शीतल सिग्नलपासून घाटकोपर सर्वोदयपर्यंत जाण्यास एक तास लागतो; सर्वसाधारणपणे जो रस्ता केवळ पंधरा ते वीस मिनिटांत पार करता येतो.सायनपासून कुर्ला डेपोपर्यंतच्या एलबीएसवर ठिकठिकाणी अनधिकृतरीत्या पार्किंग केले जाते. या पार्किंगमध्ये अवजड वाहनांचा समावेश सर्वाधिक असतो. विशेषत: भंगार वाहून नेत असलेली अवजड वाहने येथे सातत्याने उभी असतात. या अनधिकृत पार्किंगमुळे येथील रस्ता अरुंद होतो. यात भर म्हणून की काय येथील पदपथ विविध घटकांनी व्यापले आहेत. परिणामी, अरुंद रस्ता आणि व्यापलेल्या पदपथामुळे वाहनचालक आणि पादचारी यांना अडथळा येतो. शीतल सिग्नलपासून कमानी जंक्शन ते फिनिक्स मॉलपर्यंतच्या एलबीएसलगतचा काही भाग कामाकरिता खोदण्यात आला आहे. परिणामी, रस्ता आणखी अरुंद झाला आहे.रस्त्याचे खोदकाम करताना लावण्यात आलेले बॅरिकेट्स वेडेवाकडे पडले आहेत. शिवाय साहित्यही विस्कळीत स्वरूपात रस्त्यालगत पडले आहे. खोदकामामुळे उडणारी धूळ यात आणखी भर घालत आहे. कमानी येथे तर रस्त्याहून वाहणारे पाणी ही नित्याचीच बाब झाली आहे. हॉलीक्रॉस आणि मायकल या शाळांसाठी मुले जेथून मार्गक्रमण करतात; तेथे तर सर्वाधिक वाईट अवस्था आहे. पदपथ नीट नाहीत. साहित्य वेडेवाकडे पडले आहे. रस्त्याहून पाणी वाहते आहे. खडी पदपथावर पडून आहे. बॅरिकेट्स नक्की कोणासाठी लावले आहेत; याचा पत्ता लागत नाही.अजवड वाहने रस्त्यालगत उभी असल्याने कोंडी आणखी वाढते. विशेषत: दुपारी साडेबारा आणि सायंकाळी ५ ते ७ दरम्यान याचा त्रास नागरिकांना होतो. या सर्व समस्यांमुळे शीतल सिग्नलपासून घाटकोपर सर्वोदयपर्यंत जाण्यास एक तास लागतो; सर्वसाधारणपणे जो रस्ता केवळ पंधरा ते वीस मिनिटांत पार करता येतो.

टॅग्स :रस्ते वाहतूकमुंबई