घरफोड्या करणाऱ्या त्रिकूटाला अटक

By Admin | Published: July 5, 2016 02:07 AM2016-07-05T02:07:40+5:302016-07-05T02:07:40+5:30

दिल्ली आणि मुंबईत चोऱ्या आणि घरफोड्या करणाऱ्या त्रिकूटाला डोंगरी पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका अपंग व्यक्तीचाही समावेश आहे.

The house arrest trio arrested | घरफोड्या करणाऱ्या त्रिकूटाला अटक

घरफोड्या करणाऱ्या त्रिकूटाला अटक

googlenewsNext

मुंबई : दिल्ली आणि मुंबईत चोऱ्या आणि घरफोड्या करणाऱ्या त्रिकूटाला डोंगरी पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका अपंग व्यक्तीचाही समावेश आहे.
मुळचे दिल्ली येथील रहिवासी असलेले बहार आलम शेख (३०), हुसेन शेख (२८), जहांगिर शेख (२८) अशी अटक त्रिकूटाची नावे आहेत. यामध्ये जहांगिर हा अपंग आहे. रमजानच्या काळामध्ये मुंबईत येऊन ते चोऱ्या करायचे. गेले महिनाभर ते मुंबईतील एमआरए मार्ग परिसरातील हॉटेलमध्ये भाड्याने राहात होते. दिवसभर मुस्लिम बांधव राहत असलेल्या परिसरांची रेकी करायचे. भांडुप, नागपाडा, मस्जिद, भेंडी बाजार, डोंगरी, मोहम्मद अली रोड, नुरबाग, ग्रण्टरोड, पायधुनी, मदनपुरा, कामाठीपुरा, मालवणी, मालाड, बेहराम पाडा, एमआरए मार्ग अशा विविध ठिकाणी त्यांनी आपले सावज शोधले. पहाटेच्या वेळी सहेरीसाठी उठलेल्या नागरिकांची घरे उघडी आहेत का ते पहायचे. एखाद्याचे घर उघडे आढळल्यास त्यांच्या घरांमधील सामान ते लंपास करत असे. शिवाय पहाटे नमाजच्या वेळी जहांगिरच्या अपंगत्वाचा फायदा घेत त्याला धार्मिक स्थळाबाहेर भीक मागायला उभे करायचे. त्याला पैसे देण्यासाठी गर्दी जमताच नागरिकांच्या खिशातील मोबाईल ते लंपास करत होते. त्यानंतर सिग्नलकडे उभ्या असलेल्या चालकांकडे पैसे मागण्याच्या बहाण्याने हे त्रिकूट चोरी करुन पसार व्हायचे.
अशाप्रकारे त्यांनी दिल्लीसह मुंबईत धुमाकूळ घातला होता. रविवारी रात्री गुप्तमाहितीदारांमार्फत हे त्रिकूट एमआरए मार्ग परीसरातील हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती डोंगरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून या त्रिकुला जेरबंद केले. डोंगरी, एमआरए मार्ग परिसरात या आरोपींविरोधात गुन्हे दाखल आहेत. २००९ मध्ये यापैकी बहार शेखवर कारवाई करण्यात आली होती. अटक त्रिकूटाकडून ३० मोबाईल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांकडेही पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती डोंगरी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The house arrest trio arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.