लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अनेक वर्षांपासून डागडुजी न केल्याने कुर्ला बैलबाजार परिसरातील संदेशनगर येथे मंगळवारी सकाळी एक दुमजली घर कोसळले. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील सहा जण जखमी झाले आहेत. यातील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर येथील रहिवाशांनी शासनाविरुद्ध जोरदार आंदोलनदेखील केले. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. याच विमानतळाला लागून संदेशनगर परिसर आहे. शासनाकडून कारवाई होणार असल्याने अनेकांनी घरांची कित्येक वर्षांपासून डागडुजी केलेली नाही. त्यामुळे परिसरातील अनेक घरे मोडकळीस आलेली आहेत. सुनील कदम यांचे घरदेखील अनेक वर्षांपासून डागडुजीच्या प्रतीक्षेत होते. त्यांनीदेखील या घराची दुरुस्ती केली नाही. परिणामी मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे घर कोसळले. घटनेत सुनील कदम (५०) यांच्यासह सीमा कदम (४५), राखी कदम (२६), जितू कदम (३५), सपना कदम (१६) तसेच सुशीला कदम (७०) हे सहा जण जखमी झाले आहेत. तर यातील सुशीला कदम यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शासनाच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी रहिवाशांनी आंदोलनदेखील केले. या वेळी रहिवाशांनी रास्ता रोकोदेखील करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. जीव मुठीत घेऊन राहण्यापेक्षा शासनाने तत्काळ आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणीदेखील या वेळी रहिवाशांनी केली आहे.
घर कोसळून सहा जखमी
By admin | Published: May 31, 2017 6:42 AM