Join us

घर कोसळून महिला ठार

By admin | Published: March 17, 2016 2:22 AM

वांद्रे येथील खेरवाडी परिसरात दुमजली घर कोसळून त्यात एक महिला ठार झाली. या घटनेत ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर सांताक्रूझ येथील व्ही.एन. देसाई रुग्णालयात

मुंबई : वांद्रे येथील खेरवाडी परिसरात दुमजली घर कोसळून त्यात एक महिला ठार झाली. या घटनेत ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर सांताक्रूझ येथील व्ही.एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक घोंगडे यांनी दिली. खेरवाडी परिसरातील हुमिया मंदिरासमोरील प्लॉट क्रमांक ३७ आणि १५१ येथे बागडी कुटुंब राहत होते. या दुमजली घराची माती थोडी-थोडी पडत असल्याचे कांतादेवी बागडी (५५) आणि सुशीला बागडी (४०) यांच्या सकाळी लक्षात आले. त्या वेळी या घरात झोपलेल्या मुलांना उठवण्यासाठी त्यांनी घरात धाव घेतली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. मुलांना उठवून घरातून बाहेर पडण्याच्या आत वरच्या मजल्याचा स्लॅब कोसळला. घराचा मुख्य आधार गेल्याने संपूर्ण घर कोसळले. यात ढिगाऱ्याखाली २ जण अडकल्याची तसेच ६ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाला मिळाली. सकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला ही माहिती देण्यात आली. त्यानंतर तत्काळ येथे मदतकार्य सुरू झाले. ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे रुग्णालयात नेण्याआधीच कांतादेवी बागडी यांचा मृत्यू झाला. तर सुशीला बागडी यांना शरीराच्या डाव्या बाजूला जबर मार बसला आहे. गुलझरी, डॉली, पायल, आर्या, गौरव, गोपाल, रोहित हे सात जण जखमी झाले आहेत. गौरव आणि रोहित या दोघांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. अन्य पाच जणांची प्रकृती स्थिर आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. (प्रतिनिधी) सुशीला बागडी गंभीर जखमीसुशीला बागडी (४०) यांना जबर मार बसला आहे. तसेच त्यांच्या डोक्यालादेखील जखम झाली आहे. त्यांच्या डाव्या पायाला, हाताला जखमा झाल्या आहेत. काही प्रमाणात त्यांना मुका मारदेखील बसला आहे. सुशीला यांचे एमआरआय, सीटीस्कॅन करण्यात आले आहे. पण अहवाल नॉर्मल आला आहे. त्यांच्यावर वॉर्डमध्येच उपचार सुरू आहेत. डॉली बागडी (१६) हिच्या दोन्ही पायांना जखमा झाल्या असून पाठीला मुका मार बसला आहे. गुलझरी बागडी (३२) याच्या दोन्ही पायांना आणि उजव्या हाताला जखमा झाल्या असून पाठीला मार बसलेला आहे. पायल बागडी (१०) हिला मुका मार बसला आहे. हिच्या डोक्यालादेखील जखम झाली आहे. आर्या बागडी (५) हिच्या डोक्याला थोडा मार बसला असून हाताला किरकोळ जखमा झाल्या आहेत. गौरव बागडी (९) याला किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्याच्यावर बाह्य रुग्ण विभागात उपचार करून घरी सोडण्यात आले. रोहित बागडी याच्या डाव्या पायाला लागले असून उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले. मयत व्यक्ती : कांतादेवी जयसिंग बागडी (५५)जखमींची नावे : गुलझरी बागडी (३२), डॉली बागडी (१६), पायल बागडी (१०), सुशीला बागडी (४०), आर्या बागडी (५), गौरव बागडी (९), गोपाल बागडी (२४), रोहित बागडी (८)