Join us

गोवंडी दुर्घटनेत घर कोसळून वाहनांचेही नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना थांबता थांबत नाहीत. शुक्रवारी पहाटे पाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना थांबता थांबत नाहीत. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोवंडीच्या शिवाजीनगर येथे एक दुमजली घर पत्त्यांसारखे कोसळून मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर एकूण सात जण यात जखमी झाले. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोवंडीच्या शिवाजीनगर येथील अहिल्याबाई होळकर मार्गावर घर कोसळण्याचा मोठा आवाज झाला. अग्निशामक दल व महानगरपालिकेचे मदत कार्य पोहोचण्याच्या अगोदर तेथे स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले होते.

सुरुवातीला स्थानिकांनी तळमजल्याच्या असणाऱ्या दुकानातील लोखंडी वस्तू बाजूला सारल्या. त्यानंतर या घराच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. हे घर कोसळल्यानंतर घराखाली उभ्या असणाऱ्या वाहनांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये दोन दुचाकी व एक रिक्षा पूर्णपणे दबली गेली. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या ठिकाणी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

अखेर पोलिसांनी दुर्घटनेच्या ठिकाणचा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. या वेळी अग्निशामक दलाचे जवान, स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने सर्व जखमी व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. यानंतर जेसीबीच्या साहाय्याने संपूर्ण घर जमीनदोस्त केले गेले व ढिगारा बाजूला करण्यात आला. स्थानिक रहिवासी हरीश नायर यांच्या म्हणण्यानुसार, गोवंडीतील अनधिकृत बांधकामांना प्रशासकीय व राजकीय व्यक्तींचा वरदहस्त आहे. या परिसरात अनेक अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे येथे नेहमी घर कोसळणे, आग लागणे यांसारख्या घटना घडतात आणि यात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतो.

कोट :

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सर्व जण गाढ झोपेत असताना अचानक घर कोसळण्याचा व किंचाळण्याचा मोठा आवाज झाला. घर कोसळल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. यामुळे घरातील काही नागरिकांचा जीव वाचला. मी रात्रपाळीसाठी बाहेर असल्याने मी अपघातातून बचावलो.

- मोहम्मद शेख, मृत व्यक्तींचे नातेवाईक

गोवंडी व मानखुर्द या परिसरात घर कोसळण्याच्या घटना नवीन नाहीत. प्रत्येक जण आपापल्या मर्जीनुसार येथे घरांचे मजल्यांवर मजले चढवत आहे. त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे येथे प्रत्येक महिन्याला घर कोसळण्याच्या घटना घडत असतात.

- जुनेद हसन, बचाव कार्यात मदत करणारे स्थानिक रहिवासी.

आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले दुःख

गोवंडी दुर्घटनेबद्दल राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले. गोवंडीची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून तेथे बचावकार्य सुरू आहे. तेथील मृतांच्या दुःखात सहभागी असल्याचे ते म्हणाले.