सांताक्रूझ-वाकोला नाल्यात घर कोसळले; दीड वर्षीय चिमुकलीसह दोन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 05:02 PM2020-08-04T17:02:22+5:302020-08-04T22:51:07+5:30
सांताक्रूझ वाकोला येथील धोबीघाटमधील ६९४ आणि ६९५ या घराचे बांधकाम लगतच्या नाल्यात कोसळले.
मुंबई : पावसाने झोडपून काढले असतानाच मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सांताक्रूझ वाकोला येथील धोबीघाटमधील ६९४ आणि ६९५ या घराचे बांधकाम लगतच्या नाल्यात कोसळले. याच क्षणी ६९४ या घरात वास्तव्यास असलेली एक महिला आणि तीन मुलीदेखील नाल्यात पडल्या. यातील एका मुलीला पोलीसांनी सुखरुप बाहेर काढले. आणि पोलीसांच्या गाडीतून व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलीचा मृत्यू झाला असून, जान्हवी मिलिंद काकडे या दिड वर्षीय मुलीचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी ११.३१ वाजता सांताक्रूझ येथे धोबी घाट रोड येथे नाल्याला लागून असलेले तळमजला अधिक एक असे बांधकाम असलेल्या घराची नाल्याची बाजूची भिंत पडून वरील मजला संपुर्ण कोसळला. या घटनेत घरात असलेल्या ३ मुली व १ महिला अशा चौघी नाल्यात पडल्या. चौघींपैकी एका मुलीस स्थानिकांनी सुरक्षित बाहेर काढून व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. आतापर्यंत एक महिला व २ मुलींना बाहेर काढण्यात आले. व्हि.एन. देसाई रुग्णालयाकडून प्राप्त माहितीनुसार, शिवन्या मिलिंद काकडे या मुलीची प्रकृती स्थिर आहे. तर जान्हवी मिलिंद काकडे (दिड वर्ष) आणि रेखा काकडे (२६) यांचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला. चौथ्या मुलीचा शोध सुरु आहे.
मुंबईत दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली. मात्र त्यापूर्वी पडलेल्या पावसाने मुंबईकरांना धो धो धुतले. ४ ऑगस्टच्या पहाटे अडीच वाजता चेंबूर येथील माहुल रोडवरील एका घरावर झाड कोसळले. यात अदनान बाबु शेख आणि इम्रान बाबु शेख ही दोने मुले जखमी झाली. गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. पश्चिम उपनगरात एके ठिकाणी घर कोसळले. शहरात १७, पूर्व उपनगरात ५, पश्चिम उपनगरात २० अशा एकुण ४२ ठिकाणी झाडे कोसळली. शहरात १६ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. पूर्व उपनगरात ६ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. पश्चिम उपनगरात ५ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. एकूण २७ ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या.