Join us

सीवूड येथे इमारतीमध्ये घराला आग

By admin | Published: April 06, 2015 4:59 AM

सीवूड येथील तेरा मजली इमारतीमध्ये आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. ए.सी. मध्ये शॉर्टसर्किट होवून लागलेल्या आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झाले.

नवी मुंबई : सीवूड येथील तेरा मजली इमारतीमध्ये आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. ए.सी. मध्ये शॉर्टसर्किट होवून लागलेल्या आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झाले. मात्र इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा निकामी असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास विलंब झाला.सीवूड सेक्टर ४२ येथील शांती वैभव या तेरा मजली इमारतीमध्ये रविवारी पहाटे आग लागली. इमारतीच्या नवव्या मजल्यावर राहणाऱ्या मनीषा लोकेगावकर यांच्या घरामध्ये पहाटे चार वाजता आग लागली. यावेळी दोन मुलांसह त्या घरामध्ये झोपलेल्या होत्या. एसीमध्ये शॉर्टसर्किट होवून आग लागल्याचे समजताच त्यांनी घराबाहेर पळ काढला. सदर घटनेची माहिती नेरुळ अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी हजेरी लावली. यावेळी आग विझवण्याकरिता त्यांना चांगलीच कसरत करावी लागली. इमारतीमध्ये आग विझवण्याची यंत्रणा असूनही ती कार्यान्वित नव्हती. यामुळे इमारतीच्या नवव्या मजल्यापर्यंत पाइप नेवून घरामध्ये पाण्याचा मारा करावा लागला. तोपर्यंत वरच्या मजल्यापर्यंत आग पसरण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तासाच्या प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य दुर्घटना टळली. या घटनेत मनीषा लोकेगावकर यांच्या घरातील लाकडी साहित्यासह, विद्युत उपकरणेही पूर्णपणे जळाली आहेत. या इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा असूनही ती कार्यान्वित नव्हती. यावरुन त्यांना नोटीस देखील बजावण्यात आलेली असे अग्निशमन अधिकारी अमृतानंद बोराडे यांनी सांगितले. यानंतरही सोसायटीने त्याचे गांभीर्य न घेतल्याने रविवारी पहाटे लागलेली आग विझवण्यात अडथळा झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सदर सोसायटीला पुन्हा नोटीस बजावण्यात येणार असल्याचेही बोराडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)