हाउस‘फूल’ दादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 04:31 AM2017-10-13T04:31:29+5:302017-10-13T04:34:17+5:30
दादर... मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील मध्यवर्ती स्थानक. पश्चिम आणि मध्य रेल्वे या ठिकाणी एकत्र येऊन मिळतात. शिवाय खरेदी करायची तर दादरलाच... असे काहीसे गणितच आहे.
दादर... मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील मध्यवर्ती स्थानक. पश्चिम आणि मध्य रेल्वे या ठिकाणी एकत्र येऊन मिळतात. शिवाय खरेदी करायची तर दादरलाच... असे काहीसे गणितच आहे. त्यातच दादरचे फूल मार्केट सणासुदीला हाउस‘फूल’ असते. पुलांवरील अरुंद ‘दादर’ गर्दीला सामावून घेण्यास असमर्थ ठरत आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारी ही गर्दी, डळमळीत नियोजन याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन लुंगसे, महेश चेमटे आणि सागर नेवरेकर यांनी.
मध्य रेल्वे स्थानक-डर के आगे जीत है, दादर पर बहुत भीड है... अशी अवस्था ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या दादर रेल्वे स्थानकाची आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावरील मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारे महत्त्वाचे स्थानक म्हणून दादर ओळखले जाते. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर स्थानकातील पुलांसह, पादचारी पुलांवरील फेरीवाले हटवण्यात आले आहेत. यामुळे स्थानकावरील रोज सुमारे ६ ते ७ लाख प्रवाशांना दिलासा मिळत आहे. मात्र स्थानकातील अरुंद पुलालादेखील रेल्वे प्रशासनानेपर्यायी व्यवस्था निर्माण करावी,अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
फलाट क्रमांक १, २-
दादर (मध्य) फलाट क्रमांक १ आणि फलाट क्रमांक २ वरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेकडील पादचारी पूल हा अरुंद आहे. महापालिका आणि रेल्वे हद्दीत हा पूल आहे. पुलाच्या पूर्वेकडील बाजू ही शिवनेरी एसटी स्थानकाकडे उतरणारी आहे तर पश्चिमेकडील बाजू फूल मार्केटला उतरणारी आहे. यामुळे या पुलावर नेहमी वर्दळ असते. पश्चिमेसह मध्य रेल्वे आणि दादर पूर्व-पश्चिम असा जोडणारा हा पूल आहे. सिद्धिविनायक मंदिराकडे जाणारी शेअर टॅक्सीदेखील या पुलाच्या पश्चिमेस आहे. परिणामी, अन्य पुलांऐवजी हा पूल
वापरणे भाविकांसाठी जास्त सोयीचे ठरते.
फलाट क्रमांक ३, ४, ५-
फलाट क्रमांक ३वरून सीएसएमटीसाठी धिम्या आणि ४वरून कल्याण दिशेला जाणाºया जलद लोकल धावतात. फलाट क्रमांक ४वर सायंकाळी रेल्वे कँटीनचे सामान विखुरलेले असते. कँटीनमध्ये पुरवण्यात येणाºया ‘रेल्वेनीर’चा साठा फलाट क्रमांक ५वरील कँटीनमधून पुरवण्यात येतो. सायंकाळी गर्दीच्या वेळी हा साठा फलाटावरच असल्याने प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी कसरत करावी लागते.
फलाट क्रमांक ६-
फलाट क्रमांक ६ सीएसएमटीच्या दिशेकडील दुसºया बोगीसमोरून फलाटावरून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. हा मार्ग प्रवाशांसाठी सोयीचा आहे. मात्र या मार्गातून भटकी कुत्री स्थानकात प्रवेश करून फलाटावर वावरतात. परिणामी, भटक्या कुत्र्यांना आवर घालणे गरजेचे असल्याचे दादर नायगाव येथे राहणा-या प्रेम मिश्रा या तरुणासह बहुसंख्य प्रवाशांचे म्हणणे आहे.
फूल मार्केट- उपनगरीय रेल्वेमध्ये पश्चिम रेल्वे अधिक विकसित समजली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र दादर रेल्वे स्थानकात तिचा बोजवारा उडाला आहे. मुळात या मार्गावरील जिन्यांवर लक्ष केंद्रित केले असता त्याची रुंदी वाढविणे गरजेचे आहे. अरुंद जिन्यांमुळे येथील गर्दी पुलावर मावत नाही. परिणामी, गर्दीचा भस्मासूर वाढत आहे. या मार्गावर पुलांची संख्या पुरेशी असली तरी त्याची कनेक्टिव्हिटी नीट नाही. उत्तरेकडील पूल बºयापैकी लांब आहे. परिणामी, त्याचा वापर कमी होतो. पादचारी पुलाची जोडणी या मार्गाला असली तरी गर्दी म्हणावी तशी पसरली जात नाही. मधला म्हणजे नवा पूल बºयापैकी मोठा असला तरी येथे मरे आणि परेचे प्रवासी एकत्र आल्याने गर्दीत भर पडते आहे.
याव्यतिरिक्त आणखी एक मधला जुना अरुंद पूल गर्दी सहन करत असला तरी त्याला काही मर्यादा आहेत. मुळात हा पूल अरुंद आहे. या कारणास्तव येथील गर्दी तापदायक ठरत आहे. या पुलावर फेरीवाले काही प्रमाणात बसत असल्याने अरुंद पूल आणखी अरुंद होत आहे. त्यामुळे गर्दीला आवरणे कठीण होत आहे. महत्त्वाचे म्हणजे पादचारी पुलावरचे फेरीवाले हटविण्यात प्रशासनाला यश आले असले तरी येथे पुरेशी सुरक्षाव्यवस्था नाही. वाढत्या गर्दीच्या तुलनेत तैनात पोलीस कमी आहेत.
पुलावरचे जिने अरुंद असून, ते गर्दीला आमंत्रण देत आहेत. पीक अवरला मुंगी चालण्यासदेखील जागा नाही, अशी येथील अवस्था आहे. यावर सारासार उपाय म्हणजे गर्दीचे व्यवस्थापन हा होय. परंतु एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतरही प्रशासन गंभीर नाही, अशी अवस्था आहे. एकंदर नवा पूल उभारला असला तरी जुन्या पुलावरची गर्दी इकडे शिफ्ट होत नाही. यासाठी जनजागृती आवश्यक असून, रेल्वे प्रशासनाने ती करणे गरजेचे आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांची ये-जा सुरू असणाºया दादर टर्मिनसची कथाही काही वेगळी नाही. मुळात मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दादरमुळे टर्मिनसवर दिवसाचे २४ तास गर्दी असते. देशी आणि विदेशी पर्यटकांसह लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा सातत्याने येथे भरणा असतो. प्रत्यक्षात मात्र या प्रवाशांसाठी येथे असणा-या सेवा-सुविधांचा बोजवारा उडाला आहे. दादर टर्मिनस येथे गर्दी वाढणार हे माहीत असूनही पुरेशा सेवा पुरविण्यात येत नसल्याने प्रशासन येथील प्रत्येक गोष्टीत तोंडावर पडले आहे. गर्दीच्या व्यवस्थापनाबाबत तर येथे कायमच ढिसाळ कारभार असून, सुरक्षा यंत्रणेबाबतही रेल्वे प्रशासन येथे तोकडे पडले आहे. दादर टर्मिनसच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारावर चौकी असली तरी प्रत्यक्षात मात्र आवश्यक सुरक्षा यंत्रणेचा तेथे समावेश नाही. टर्मिनसच्या फलाटांवर गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक सुरक्षायंत्रणा येथे तैनात नाही. फलाटांवर लांब पल्ल्याच्या गाड्या उभ्या असताना आणि नसतानाही येथे सुरक्षारक्षक असणे अपेक्षित आहे. परंतु याबाबतही ढिसाळ कारभार आहे.
मुख्य प्रवेशद्वार- मुख्य प्रवेशद्वारावर टॅक्सीची लागलेली लांबलचक रांग गर्दीत भर घालत असून, येथील वाहतुकीला शिस्त नाही. परिणामी, मुख्य प्रवेशद्वारापासूनच वाहतुकीला शिस्त लागणे अपेक्षित आहे. दादर टर्मिनसवरील लांबलचक फलाटावरील पुलांना म्हणावी तशी कनेक्टिव्हिटी नाही. परिणामी, प्रवाशांची पायपीट सुरूच आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल एकत्र आल्याने होणाºया गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी येथे यंत्रणा नाही. आणि आरपीएफचे जवान तैनात असले तरी येथील गर्दीचे व्यवस्थापन करण्यात त्यांची तत्परता तेवढ्या वेगाने दिसून येत नाही. परिणामी, दादर टर्मिनस आणि मध्य रेल्वेमार्गावरील प्रवाशांची तारांबळ उडत आहे. महत्त्वाचे म्हणजे मध्य रेल्वेमार्गासह पश्चिम रेल्वेवर पुरेसे सरकते जिने नाहीत.
जे आहेत त्यावर सकाळी आणि संध्याकाळी होत असलेल्या गर्दीमुळे प्रवाशांचा वेळ फलाटावरच वाया जात आहे. प्रवाशांनी सरकत्या जिन्यांऐवजी पायºयांचा आधार घेतला तरी इथली गर्दीही वाढीव वेळेत भर घालत आहे. मुळात मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि दादर टर्मिनस येथील वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने केव्हाच पुढाकार घेणे गरजेचे होते. पूल एकमेकांना जोडणे आवश्यक होते. मात्र हे काम वेगाने होत नाही. आणि सध्याची परिस्थिती पाहता कनेक्टिव्हिटीचा प्रस्ताव आला तरी अपुºया जागेमुळे कनेक्टिव्हिटी कितपत यशस्वी होईल; याबाबत साशंकता आहे. दरम्यान, एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर पालिकेसह रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलासह स्थानकांलगतच्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला असला तरी प्रत्यक्षात १५ दिवसांनी परिस्थिती काय असेल? याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
...तर एल्फिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळणे शक्य
दादर स्थानक परिसरात सुमारे ९ हजार ५०० अनधिकृत फेरीवाले आहेत. यात लहान-मोठ्या सर्वच फेरीवाल्यांचा समावेश आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर विविध रेल्वे स्थानकांवरील पुलांसह पादचारी पुलांवरील फेरीवाल्यांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, रेल्वे पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई हाती घेतली आहे. या कारवाईमुळे पादचारी पुलावरून प्रवाशांना चालणे सोईस्कर झाले आहे. ही कारवाई केवळ ८-१० दिवस न करता कायमस्वरूपी ठेवल्यास प्रवाशांना त्याचा फायदा होईल. यामुळे एल्फिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळता येणे शक्य आहे.