दिघावासी धडकले पालकमंत्र्यांच्या घरावर

By admin | Published: June 12, 2016 04:10 AM2016-06-12T04:10:17+5:302016-06-12T04:10:17+5:30

दिघ्यातील ९६ इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने हवालदिल झालेल्या शेकडो रहिवाशांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शनिवारी थेट ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे

In the house of Guardian | दिघावासी धडकले पालकमंत्र्यांच्या घरावर

दिघावासी धडकले पालकमंत्र्यांच्या घरावर

Next

ठाणे : दिघ्यातील ९६ इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने हवालदिल झालेल्या शेकडो रहिवाशांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शनिवारी थेट ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराकडेच मोर्चा वळवला आणि तब्बल पाच तास ठिय्या देत दिलासा देण्याची मागणी केली. अखेर, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी फोनवरून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी दिली. सोमवारपर्यंत यावर योग्य तोडगा निघाला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दिघा येथील रहिवाशांची गेले वर्षभर न्यायालयीन लढाई सुरू आहे. येथे सुमारे ९६ इमारती असून त्यात २५ ते ३० हजार रहिवासी वास्तव्य करीत आहेत. मधल्या काळात अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी २०१५ पर्यंतची सर्व बांधकामे अधिकृत करण्याचे सूतोवाच केले होते. परंतु, त्यासंदर्भातील कोणतेही लेखी आदेश अथवा सूचना न्यायालयात न पोहोचल्याने उच्च न्यायालयाने पुन्हा दिघ्यातील बांधकामे तोडण्याचे आदेश दिले आहेत. ती मुदत संपत आली आहे. त्यानुसार, येथील रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या असून सोमवारपर्यंत घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बांधकामांवर बुधवारपासून हातोडा टाकण्यात येणार आहे. पावसाळा आणि मुलांच्या सुरू झालेल्या शाळा या पार्श्वभूमीवर न्यायालयाचे आदेश आल्याने रहिवासी हवालदिल झाले होते. त्यामुळे या रहिवाशांना न्याय मिळावा आणि ‘कॅम्पा कोला’प्रमाणेच ही घरेदेखील अधिकृत करावी, या मागणीसाठी शनिवारी सकाळी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी प्रथम दिघ्यात एक सभा घेतली. त्यानंतर, अचानक त्यांनी थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराकडेच मोर्चा वळवला.
आंदोलनकर्त्यांनी सकाळी ११ वाजता काजूवाडी परिसरातील पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केले. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले असल्याने आंदोलनकर्ते आणखी आक्रमक झाले. त्यामुळेच जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
दिघ्याचे रहिवासी पालकमंत्र्यांच्या घरावर धडकल्याचे वृत्त समजताच खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांच्या घराकडे कूच केले. संतप्त रहिवाशांनी पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी सुरू करताच शिवसैनिकही आक्रमक झाले. परंतु, पोलिसांनी मध्यस्थी केली आणि या आंदोलनाला वेगळे वळण लागू दिले नाही. त्यानंतर, खासदार राजन विचारे यांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांशी आंदोलनकर्त्यांची चर्चा घडवून आणली. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
पोलिसांनीही आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. मधल्या काळात आमदार संदीप नाईक यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री चर्चा करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवा, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आंदोलनकर्ते जोशात आले. अखेर दुपारी ३.३० च्या सुमारास माजी खासदार संजीव नाईक यांनी घटनास्थळी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर अर्ध्या तासात आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा आमदार विद्या चव्हाण यांनी केली. (प्रतिनिधी)

दिघा येथील एमआयडीसीच्या जागेवरील इमारतीसंदर्भात कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत येथील रहिवाशांवर अन्याय होऊ देणार नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात येणार आहे.
- एकनाथ शिंदे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री

आम्ही दिघावासीयांच्या पाठीशी
कोर्टातला लढा असो किंवा त्याबाबत धोरण ठरवणे, शिवसेना-भाजपा युती दिघावासीयांच्या पाठीशी पहिल्यापासूनच खंबीरपणे उभी आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रकरणी केवळ स्टंटबाजी करते आहे. अनधिकृत इमारती कोणाच्या आशीर्वादाने उभ्या राहिल्या आहेत, हे लोकांना माहीत आहे.
- राजन विचारे, खासदार

Web Title: In the house of Guardian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.