महिलांच्या हाती घराची चावी! आराेग्य सेवेला बूस्टर डोस!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 02:59 AM2021-03-09T02:59:48+5:302021-03-09T03:00:42+5:30
महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात १ % सवलत, शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत मिळेल बिनव्याजी कर्ज
मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात तारणाऱ्या राज्यातील सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या संकल्पपूर्तीसाठी ७,५०० कोटींच्या योजना व महिला दिनाचे औचित्य साधत ग्रामीण भागातील शालेय मुलींना राज्य परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास, महिलांच्या नावे गृहखरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत, मुदतीत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली.
महाविकास आघाडी सरकारचा २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा १ लाख ३० हजार कोटींचा अर्थसंकल्प सोमवारी अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. आरोग्यपूर्ण जीवन ही माणसाच्या सुखी आयुष्याची पूर्वअट आहे, हे कोरोनाने अधोरेखित केले आहेच. राज्याच्या अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब उमटले. शहरी जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती, सात नवीन वैद्यकीय महाविद्यालये, साथरोग अद्ययावत संदर्भ सेवा रुग्णालये, हृदयरोग रुग्णांसाठी कॅथलॅब, ग्रामीण भागामध्ये कर्करोग निदानाची सोय अशा सोयी-सुविधांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
७५००कोटी सार्वजनिक आरोग्यासाठी
n पुणे शहरासाठी बाह्यवळण रस्ता
n नागपूरसाठी मेट्रोचा विस्तार
n पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला मंजुरी
n ‘बर्ड फ्लू’सारख्या रोगांना आळा घालण्यासाठी पुणे येथे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारणार
शून्य टक्के
व्याजाने पीककर्ज
तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार.
सरकारचे ‘धार्मिक कार्ड’
n राज्यातील मंदिरे, तीर्थक्षेत्रांचा विकास, संवर्धन करण्याचा संकल्प सोडत धार्मिक कार्ड आणले.
n एकीकडे हिंदुत्वाच्या
मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेत कलगीतुरा चालला असताना राज्याच्या अर्थसंकल्पात
धार्मिक स्थळांच्या विकासावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे.
- सविस्तर/आतील पान