Join us

वडील ओरडतात म्हणून अल्पवयीन मुलीने सोडले घर, दादरमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 1:59 AM

वडील ओरडतात म्हणून १७ वर्षीय मुलीने घर सोडल्याचा प्रकार दादरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : वडील ओरडतात म्हणून १७ वर्षीय मुलीने घर सोडल्याचा प्रकार दादरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दादर पश्चिमेकडील परिसरात १७ वर्षीय रुची (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. तेथीलच शाळेत ती दहावी इयत्तेत शिक्षण घेत आहे. तिचा स्वभाव हट्टी आहे. तिचे वडील तिचे सर्व हट्ट पूर्ण करत होते. एखादा हट्ट पूर्ण झाला नाही किंवा तिला वडील ओरडले तर ती थेट भावाच्या घरी निघून जायची. शाळेतूनही तिच्याबाबत तक्रारी येण्यास सुरुवात झाल्याने वडील तिला ओरडले. शिवाय अभ्यास करण्याकरिता तिला घरात ठेवून बाहेरून ते कडी लावत असत. त्यामुळेही तिच्या रागात भर पडली.१६ मे रोजीही खासगी शिकवणीतून तिचा अभ्यास पूर्ण होत नसल्याबाबत तक्रारी आल्या. त्यामुळे वडील पुन्हा ओरडले; आणि तिला नेहमीप्रमाणे घरात कोंडून ते बाहेर गेले. रात्री परतल्यानंतर तिने चिडचिड सुरू केली.दोन दिवसांनंतर शिकवणीला जाते म्हणून घराबाहेर पडलेली रुची घरी परतलीच नाही. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्यात काही दिवसांनंतर मित्राच्या मोबाइल क्रमांकावर तिने फोन करून ती मुंबईतच मैत्रिणीकडे असल्याचे सांगितले. परंतु वडील पुन्हा ओरडतील म्हणून घरी जाण्याची भीती वाटत असल्याचे त्याला सांगितले.मात्र वडिलांनी केलेले फोन ती उचलत नव्हती. मात्र मित्रासोबत ती रोज बोलत होती. पण, आठवडा उलटूनही ती घरी न परतल्याने काळजीत पडलेल्या तिच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.