Join us

घरोघरी दिव्यांची रोषणाई

By admin | Published: November 11, 2015 1:08 AM

दीपोत्सवामुळे दक्षिण मुंबईतल्या उच्चभ्रू वस्त्यांपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरातल्या झोपडपट्ट्यांपर्यंत रोषणाईने सजलेली मुंबापुरी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी प्रकाशाने न्हाऊन निघाली.

मुंबई : दीपोत्सवामुळे दक्षिण मुंबईतल्या उच्चभ्रू वस्त्यांपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरातल्या झोपडपट्ट्यांपर्यंत रोषणाईने सजलेली मुंबापुरी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी प्रकाशाने न्हाऊन निघाली.दुपारनंतर लक्ष्मीपूजनाच्या खरेदीची लगबग सुरू झालेली दिसून आली. लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त संध्याकाळी आहेत. पूजनासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी विविध बाजारांमध्ये हाऊसफुल्ल गर्दी झाली होती. केरसुण्या, चोपड्या, लक्ष्मीच्या मूर्ती, चांदीची नाणी यांना बाजारात मोठी मागणी होती. नरकचतुर्दशीच्या पहिल्या आंघोळीने उटण्याचा सुगंध घराघरांत पोहोचविला आणि त्यानंतर भल्या पहाटे चाळींपासून झोपड्यांमध्ये सुरू झालेल्या आतषबाजीने मुंबईत चैतन्य निर्माण केले. दिवाळी पहाटच्या विविध कार्यक्रमांमुळे मुंबईचा सूर्योदय संगीत मैफिलींनी चिंब झाला होता. फराळापासून फटाके आणि नव्या वस्त्रांसहित आभूषणांचा यामध्ये समावेश होता. मंगळवारी सकाळपासून मार्केट्समध्ये खरेदी करण्यासाठी मुंबईकर बाहेर पडताना दिसले. शिवाय, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, कार्यालयांमध्येही दिवाळीचा उत्साह दिसून आला. कार्यालयाकडे झपाझप वेगाने चाकरमान्यांची पावले पडत असतानाच मुंबईकर तरुण संस्कृतीचे भान जपत पारंपरिक वेशात एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ लागला. विशेषत: सोशल नेटवर्किंग साइट्सवरून शुभेच्छांचा वर्षाव रात्री उशिरापर्यंत सुरू होता. (प्रतिनिधी)दिवाळी म्हटली की, फोटोसेशन आलेच. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अगदी दिवाळी पहाटपासून सुरू झालेला ‘सेल्फी’चा खटाटोप रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. दिवाळीच्या उत्साहाच्या वातावरणात यंगस्टर्सने ‘मौके पे चौका’ म्हणत गेट-टुगेदर, गप्पा, टीपी असे म्हणत मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालविला. शिवाय, सोशल नेटवर्किंग साइट्सवरही दिवाळीचे डीपीज्, प्रोफाइल फोटो अपलोड करण्यासही वेळ दवडला नाही.लक्ष्मीपूजनासाठी सज्जलक्ष्मीपूजनाची तयारी करण्यासाठी मुंबईकरांनी फुले, केरसुण्या, चोपड्या आणि लक्ष्मीच्या प्रतिमेच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली. दादर, लालबाग, क्रॉफर्डमार्केट, भुलेश्वर, घाटकोपर, कुर्ला आणि उपनगरांतील इतर बाजारपेठांमध्येही लक्ष्मीपूजनाच्या तयारीसाठी मुंबईकर घराबाहेर पडलेले दिसून आले.