Join us

महापालिकेचे घर पडले महागात, पावणे तीन कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 1:55 AM

महानगरपालिकेच्या इमारतीत स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली ४७ जणांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार मानखुर्द-गोवंडीत उघडकीस आला आहे.

मुंबई : महानगरपालिकेच्या इमारतीत स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली ४७ जणांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार मानखुर्द-गोवंडीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्दच्या आंबेडकरनगरमध्ये राहणारे प्रदीप कदम (४१) यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा वाहने खरेदी- विक्रीचा व्यवसाय आहे. नवीन घराच्या शोधात असतानाच, ठग अस्लम नरुल्ला शेख (४५) याच्यासह अविनाश कावळे (३५), किशोर धोत्रे (३५) आणि मनोज थोरात (५०) यांनी त्यांना मानखुर्दमधील मंडाळा, तुर्भे येथे मुंबई महानगर पालिकेच्या इमारतीमध्ये स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांना घराचे विवरणपत्रसुद्धा बनवून दिले होते.पैसे भरुनही घर मिळत नसल्याने, त्यांनी आरोपींकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. आरोपी नॉटरिचेबल झाल्यानंतर, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार,त्यांनी याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांत धाव घेतली. तेव्हा, २०१६ ते २०१७ दरम्यान या ठगांनी त्यांच्यासह ४७ जणांची फसवणूक केल्याचे समोर आले. यामध्ये जवळपास पावणे तीन कोटींची फसवणूक करण्यात आली आहे.