Join us

मुंबई उपनगरांतील घरांच्या किमतींमध्ये १० टक्क्यांची झाली वाढ; वन बीएचके घरांकडे ग्राहकांचा कल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 10:11 AM

जमिनी, बांधकाम साहित्य महागल्याने फटका.

मुंबई : मार्च अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत मुंबईत उपनगरातील घरांच्या किमतीत किमान १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जमिनी आणि बांधकाम साहित्याच्या किमतीत झालेली वाढ, या पार्श्वभूमीवर घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. विशेष म्हणजे, आजवर वन-बीएचके घरांच्या पसंतीला मुंबईकरांनी कायमच पसंती दिली होती. मात्र, त्या घरांच्या किमतीदेखील ७५ लाख रुपयांच्या पलीकडे गेल्या आहेत.

मुंबई शहर व उपनगरामध्ये एकीकडे भूखंडाचे प्रमाण मर्यादित आहेत. यामुळे पुरवठा मर्यादित आहे आणि मागणी जास्त आहे. याचा थेट परिणाम किमत वाढीच्या रूपाने दिसून येत आहे. याचसोबत दुसरीकडे मुंबई शहर व उपनगरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे सेवा-सुविधांतही वाढ होत आहे. 

परिणामी घरांच्या किमतीतही वाढ होत आहे. तिसरा मुद्दा म्हणजे, शहर व उपनगरांत मोठ्या प्रमाणावरपुनर्विकासाची कामे सुरू आहेत. मूळ रहिवाशांना घरे दिल्यानंतर विक्रीसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. 

व्यवसायिक मालमत्ता की घरांची खरेदी?

१) २०२३ मध्ये मुंबई शहर व उपनगरात ज्या मालमत्तांची विक्री झाली त्यात निवासी मालमत्ता व व्यावसायिक मालमत्ता अशा दोघांचे प्रमाण अनुक्रमे ८० टक्के व २० टक्के आहे. 

२) विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन, अजय देवगण, काजोल, कार्तिक आर्यन, मनोज वाजपेयी अशा अनेक कलाकारांनी व्यावसायिक मालमत्तांची खरेदी केली आहे.

घरांच्या खरेदीचा ट्रेंड बदलत आहे का?

१) २०२३ या वर्षात मुंबई शहर व उपनगरात दीड लाखापेक्षा जास्त मालमत्तांची विक्री झाली. त्याचसोबत गेल्यावर्षी घर खरेदीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसत आहे. ज्यांची वन-रूमची घरे होती, त्यांनी अधिक मोठे घर घेण्याच्या दृष्टीने वन-बीएचके घरांची खरेदी केली. 

२) तूर्तास मुंबईमध्ये वन-बीएचके घरांच्या बांधकामाचे प्रमाण घटले आहे. विकासक प्रामुख्याने टू-बीएच-के किंवा त्यापेक्षा अधिक मोठी घरे बांधत आहेत. 

३) २०२३ च्या वर्षात मुंबई व उपनगरात ज्या घरांची विक्री झाली त्यामध्ये २० टक्क्यांपर्यंत घरांच्या विक्रीचे प्रमाणे हे २ बीएचके घरांचे आहे. 

४) ज्यांच्या किमती उपनगरात ७५ लाख ते दीड कोटी रुपयांपर्यंत गेल्या आहेत. तर मुंबई शहरांत याच किमती ८० लाख ते पावणे दोन कोटी रुपयांपर्यंत आहेत.

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योग