Join us

मुंबईतील घरांची भाडी ९ टक्क्यांनी महागली; ६ महिन्यांत २ लाख मालमत्ता भाडेतत्त्वावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 11:09 AM

गेल्या दीड वर्षांपासून एककीडे मुंबईत घर खरेदी जरी जोमात असली तरी घर भाड्याने घेऊन राहण्याचा ट्रेन्डही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून एककीडे मुंबईत घर खरेदी जरी जोमात असली तरी घर भाड्याने घेऊन राहण्याचा ट्रेन्डही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत मुंबईत २ लाख मालमत्ता भाड्याने गेल्या आहेत. मात्र, याचसोबत गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मुंबईत विभागनिहाय भाड्याच्या किमतीदेखील किमान ५ ते कमाल ९ टक्क्यांनी वाढल्याची नोंद झाली आहे.

चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत मुंबईत १ लाख ९० मालमत्ता भाडेतत्वावर गेल्या आहेत. गेल्यावर्षी या कालावधीमध्ये १ लाख ६३ मालमत्ता भाड्याने गेल्या होत्या. याच कालावधीच्या तुलनेत यंदाचा आकडा १३ टक्क्यांनी जास्त आहे. ज्या  मालमत्ता भाड्याने गेल्या त्यातील घरे प्रामुख्याने मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आहे. 

आजच्या घडीला पश्चिम उपनगरात वांद्रे ते मालाड दरम्यान मोठ्या प्रमाणावर जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. पुनर्विकासाच्या कालावधीमध्ये मूळ घराच्या परिसरातच घर भाड्याने घेण्याचा लोकांचा कल आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरात या मालमत्ता मोठ्या प्रमाणावर भाड्याने गेल्या आहेत.

किती भाडे मोजावे लागते?

मुंबईत विभागनिहाय सरासरी २ बीएचके घरांचे भाडे हे ३५ ते ६५ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. वन-बीएचके घरांसाठी देखील विभागनिहाय घराचे भाडे किमान २० हजार ते ५० हजार रुपयांच्या दरम्यान आहे. 

घराच्या भाड्याचे सर्वाधिक दर हे मध्य-मुंबई आणि दक्षिण मुंबईमध्ये आहेत. तर, पश्चिम उपनगरातील भाड्याचे दर गेल्या वर्षभरापासून वाढल्याचे दिसत आहे.

भाडे का वाढत आहे?

१) जी घरे भाड्याने गेली आहेत, त्यातील बहुतांश घरे ही मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आहेत. पश्चिम उपनगरात वांद्र्यापासून कांदिवलीपर्यंत मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाची कामे सुरू आहे. २) पुनर्विकासाच्या काळात पर्यायी घर घेण्यासाठी लोक आपल्याच परिसरात घरे घेत आहेत. मागणी जास्त आणि तुलनेने पुरवठा कमी अशी स्थिती असल्याने भाड्याचे दर वाढताना दिसत आहेत.

२ बीएचकेला लोकांची पसंती-

१) कोरोना काळानंतर आता भाड्याने घर घेताना लोक प्रामुख्याने २ बीएचके घरांना पसंती देत असल्याची माहिती गृहनिर्माण क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. अनेक लोकांनी वर्क फ्रॉम होम केले. 

२)  घरातून काम करताना घरात आणखी एका वेगळ्या खोलीची आवश्यकता असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. या खेरीज दुसरे प्रमुख कारण म्हणजे, २ बीएचके घर भाड्याने घेणाऱ्या लोकांमध्ये प्रामुख्याने भरणा हा तरुणाईचा आहे. 

३) कारण करिअरमध्ये जर दुसऱ्या देशात किंवा शहरात संधी आली तर तिथे जाण्याकडे तरुणाईचा कल आहे. त्यामुळे घर विकत घेऊन गुंतवणूक करण्यापेक्षा भाड्याने घर घेणे अधिक संयुक्तिक असल्याचे या लोकांचे मत आहे.

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योग