सफाई कामगारांना मिळाले हक्काचे घर, आश्रय योजनेंतर्गत घराच्या चाव्यांचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 01:13 AM2019-03-07T01:13:23+5:302019-03-07T01:13:29+5:30
निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार असल्याने सफाई कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या आश्रय योजनेच मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई : निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार असल्याने सफाई कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या आश्रय योजनेच मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प गेले अनेक वर्षे रखडला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाचे श्रेय खिशात घालण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरु झाली. या प्रकल्पनांतर्गत ८६ सफाई कामगारांना बुधवारी दुपारी एका कार्यक्रमात घरांच्या चाव्या देण्यात आल्या.
सन २००८ मध्ये मुंबई महापालिकेने सफाई कामगारांसाठी आश्रय योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत २८ हजार सफाई कामगारांना हक्काचे घर मिळणार आहे. जागेची टंचाई व असंख्य कारणांमुळे सफाई कामगार या घरकुल योजनेपासून बराच काळ वंचित राहिले. मुंबई स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या सफाई कामगारांसाठी हक्काची घरे देण्यासाठी पालिकेच्या निधीतून ‘आश्रय योजना’ राबवण्यात येत आहे. यामध्ये ‘ए’ विभाग फोर्टमधील कोचीन स्ट्रीट येथील कामगारांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या आहेत.
कोचीन स्ट्रीट येथील १३७ कामगार राहत होते. या इमारती धोकादायक झाल्यामुळे त्यांचे धारावी येथे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले होते. विविध परवानग्यांमध्ये गेल्या १५ वर्षांपासून त्यांच्या घरांचा प्रश्न रखडला होता. अखेर ८६ कामगारांना घराच्या चाव्या मिळाल्या असून उर्वरित कामगारांनाही लवकरच घरांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज दिली.
>सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास
सफाई कामगारांच्या शहर व उपनगरांमध्ये एकूण ३९ वसाहती आहेत़ यामध्ये सुमारे सहा हजार ९९० सफाई कामगारांना सेवा निवासस्थाने देण्यात आलेली आहेत. ३६ वसाहतींपैकी मुंबई शहरात - २०, पश्चिम उपनगरात ११ आणि पूर्व उपनगरात - आठ वसाहती अशा एकूण ३९ वसाहतींचा पुनर्विकास आश्रय योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
>सर्वाधिकार द्या - आदित्य
मुंबई महानगरासाठी एकाच प्राधिकरण असावे, अशी मागणी अनेकवेळा होत असते. विकास कामांसाठी विविध परवानगी घेण्यात वेळ जात असल्याने सर्वाधिकार महापालिकेकडे सोपवण्याचे मत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले.