चिमण्यांना मिळाले हक्काचे घर

By admin | Published: March 20, 2015 12:44 AM2015-03-20T00:44:16+5:302015-03-20T00:44:16+5:30

वाढते प्रदूषण, उभे राहणारे मोबाइल टॉवर्स, पक्ष्यांची कमी होणारी निवासस्थाने अशा विविध कारणांमुळे मुंबईसह आसपासच्या परिसरातील चिमण्यांची संख्या रोडावल्याची भीती पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केली.

The house of the right to get the sparrows | चिमण्यांना मिळाले हक्काचे घर

चिमण्यांना मिळाले हक्काचे घर

Next

सचिन लुंगसे ल्ल मुंबई
वाढते प्रदूषण, उभे राहणारे मोबाइल टॉवर्स, पक्ष्यांची कमी होणारी निवासस्थाने अशा विविध कारणांमुळे मुंबईसह आसपासच्या परिसरातील चिमण्यांची संख्या रोडावल्याची भीती पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केली. मात्र चिमण्यांची संख्या रोडावू नये, अथवा चिमण्या मुंबईतून लगतच्या परिसरात स्थलांतरित होऊ नयेत, म्हणून येथील सामाजिक सेवाभावी संस्थांनी चिमण्यांसाठी ‘स्पॅरो शेल्टर’ उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे सकारात्मक चित्र पाहण्यास मिळत आहे. यानिमित्ताने मुंबईतल्या चिमण्यांना हक्काचे घर मिळू लागले आहे. ‘स्पॅरोज शेल्टर’ या उपक्रमाला ‘लोकमत’ने साथ दिली आहे.
मुंबईही चिमण्या कमी होत असल्याची ओरड होऊ लागल्याने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि नेचर फॉर एव्हर सोसायटीचे प्रमुख मोहम्मद दिलावर यांच्यासह पक्षीतज्ज्ञांनी त्यामागील कारणांचे विश्लेषण सुरू केले. मानवी जीवनशैलीत झालेल्या बदलांशी चिमण्या गती ठेवू शकल्या नाहीत, असा एक निष्कर्ष या अभ्यासातून निघाला. शिवाय घरांच्या छपराखाली, कोनाड्यात चिमण्यांचे घरटे बांधले जायचे. परंतु आता शहरांमध्ये आधुनिक गृहबांधणीमुळे चिमण्यांची ही संधी हिरावली. पूर्वी घरासमोरच्या अंगणात खायला धान्य मिळत होते. आता शहरात धान्य वाळविण्यासाठी मोकळ्या जागा शिल्लक राहिल्या नाहीत. त्यामुळे चिमण्यांना खाद्य मिळेनासे झाले आहे. वाढते प्रदूषण, विद्युत तारांचे वाढते जाळे, मोबाइल, केबलच्या सिग्नल्स यामुळे चिमण्यांसाठी शहरी वातावरण राहण्यायोग्य राहिलेले नाही, असे अभ्यासातून निष्कर्ष निघाले.

नेचर फॉरेव्हर सोसायटी
मोहम्मद दिलावर संस्थापक असलेल्या नेचर फॉरेव्हर सोसायटीतर्फेदेखील आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर चिमण्यांच्या संवर्धनासाठी कार्य हाती घेण्यात आले आहे. संस्थेतर्फे चिमण्यांसाठी कृत्रिम घरे बांधण्यात येतात.

‘पॉज’ संस्थाही कार्यरत
गेल्या १३ वर्षांपासून मुंबईच्या उपनगरातील भांडुप येथे ‘पॉज’ ही संस्था पक्षी आणि प्राण्यांसाठी काम करत आहे. २०१२ सालापासून संस्थेच्या वतीने ‘स्पॅरो शेल्टर’ इच्छुकांना वितरित करण्यात येत असून, संस्थेकडून मुंबई, पुणे, नागपूर, बंगळुरू आणि दिल्ली येथे तब्बल ३ ते ४ हजार स्पॅरो शेल्टर वितरित करण्यात आली आहेत.

धारावी येथील ‘स्पॅरोज शेल्टर’ संस्थेच्या वतीने जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांकडून टी-शर्टवर चिमणीचे चित्र काढण्यात येणार आहे. या स्पर्धेत सुमारे पन्नास विद्यार्थी सहभागी होणार आहेत आणि स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांना बक्षीस म्हणून ‘स्पॅरो शेल्टर’ देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम २० मार्च रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत धारावी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या क्रीडांगणात रंगणार असून, या स्तुत्य उपक्रमाला ‘लोकमत’ने साथ दिली आहे.

धारावी येथील ‘स्पॅरोज शेल्टर’ ही संस्था चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करते. गेल्या नऊ वर्षांत संस्थेने एक लाखाहून अधिक चिमण्यांची कृत्रिम घरटी शहरातील विविध ठिकाणी लावली आहे. यात महानगरपालिकेची उद्याने, वॉटर पार्क, मॉल या ठिकाणांचा समावेश आहे. शिवाय संस्थेच्या वतीने बर्ड गॅलरी उभारण्यात आली आहे. या माध्यमातून पक्ष्यांना निवारा, अन्न, पाणी आणि सुरक्षितता प्रदान केली जात आहे.

१चिमणी हा पक्षी मूळचा भूमध्य प्रदेशातील आहे. यानंतर चिमण्या युरोपात गेल्या. दरम्यानच्या काळात म्हणजे १८५० च्या सालात न्यूयॉर्कमधील वृक्षांना कीड लागली. परिणामी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चिमण्यांच्या चक्क आठ जोड्या तेथे धाडण्यात आल्या.

२ब्रुकलिन इन्स्टिट्यूटने हा प्रकल्प हाती घेतला. परंतु सुरुवातीला चिमण्यांना नव्या वातावरणाशी जुळविता आले नाही. परिणामी त्यांचा मृत्यू झाला. कालांतराने पुन्हा नव्याने चिमण्यांच्या जोड्या धाडण्यात आल्या. काही कालावधीनंतर का होईना धाडण्यात आलेल्या चिमण्यांना तेथील थंड वातावरणाची सवय झाली.

३ त्यातच त्यांची वाढ होऊ लागली. या प्रयोगानंतर अमेरिकेत चिमण्या पसरल्या. यानंतर जगभरातील अनेक देशांत चिमण्यांचा विस्तार झाला. चिमण्यांचे मूळ हे ब्रिटन, उत्तर सायबेरिया ते उत्तर आफ्रिका, अरेबिया, भारत, ब्रह्मदेश हे समजले जाते.

Web Title: The house of the right to get the sparrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.