धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 06:07 AM2024-05-15T06:07:46+5:302024-05-15T06:09:50+5:30
एकनाथ शिंदे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पात कोणालाही धारावी बाहेर पाठवले जाणार नाही, असे आश्वासन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : धारावीत जेवढे लोक राहत आहेत, त्यांना धारावीत घर मिळेल. कोणालाही धारावीतून बाहेर जावे लागणार नाही, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारावीतील रहिवाशांना दिले.
मुंबई दक्षिण मध्यचे शिंदेसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे तामिळनाडू राज्याचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई आणि भाजपा नेते अशोक चव्हाण यांच्या सभेचे धारावीतील ९० फीट रस्त्यावर आयोजन केले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पात कोणालाही धारावी बाहेर पाठवले जाणार नाही, असे आश्वासन दिले. धारावीत दुकान असणाऱ्यांना याच ठिकाणी दुकान देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार कॅप्टन तमिळ सेलवन, शिंदेसेनेचे आमदार सदा सरवणकर उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना
काँग्रेसबरोबर गेल्यावर शिवसेनेचे हिंदुत्व गेले. आता शिंदेसेनेची खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली शिवसेना आहे, अशी टीका आमदार तमिळ सेल्चन यांनी केली. धारावीचा पुनर्विकास कोणी रोखू शकणार नाही. धारावीतील लोकांना धारावीतच घर मिळेल, असेही सेल्चन यांनी नमूद केले.
'पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत म्हणजे...'
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत म्हणजे विकासाला मत आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना मतदान करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वायकर यांच्या प्रचारार्थ आयटी पार्क येथे महायुतीच्या सभेत ते बोलत होते. वायकर यांच्या मागे ईडी लागल्यावर त्यांच्या मागे पक्षप्रमुख उभे राहिले नाहीत. वायकर माझ्याकडे आले. आमच्यामधील गैरसमज दूर झाले. राहिलो, असे मुख्यमंत्री म्हणाले.