- मनीषा म्हात्रेमुंबई : पदरात मूलबाळ नाही... किमान एकमेकांच्या साथीने वृद्धापकाळात तरी चांगले जीवन जगता येईल या आशेने तोंडओळखीच्या त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला खरा; मात्र त्यानेच दगा दिल्याने स्वत:चे हक्काचे घर गमावून आजी- आजोबांवर रस्त्यावर खितपत पडण्याची वेळ आली आहे. आता ‘कोणी घर देतं का घर...’ म्हणत ते मंत्री, पोलिसांच्या पायऱ्या झिजवत आहेत.भारतीय रेल्वेमधून २००३ मध्ये सेवानिवृत्त झालेले विठ्ठल ताह्मणकर (७५) हे मूळचे गोव्याचे. गेल्या २ महिन्यांपासून पत्नी सरिता (७३) सोबत कांदिवलीच्या संक्रमण शिबिरात राहत आहेत. पूर्वी दोघेही दहिसरच्या सद्गुरू सोसायटीतील ३५० चौरस फुटांच्या घरात राहायचे. तेथेच भाडेकरू आलेल्या विकासक राजेंद्र बर्डेशी त्यांची ओळख झाली. बर्डेने १९९३ मध्ये बोरीवलीच्या राजेंद्र कुंजमध्ये ५ लाखांत २ बीएचके घर देण्याचे आमिष त्यांना दाखविले. वृद्धावस्थेत आरामदायी जीवन जगू, म्हणून त्यांनी २१ हजार रुपये देऊन बुकिंग केले. बर्डे हा मे. ट्रूली क्रिएटिव्ह या कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवत होता. त्याच्याकडे ४ लाख ५१ हजार ७५० रुपयांत तो फ्लॅट त्यांनी बुक केला. त्यानंतर प्रकल्पाला गती आल्याने अवघ्या सहा महिन्यांत फ्लॅटचा ताबा देणार असल्याचे आश्वासन बर्डेने २००५ मध्ये दिले. त्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये भरण्यास सांगितले. एवढे पैसे नसल्याने, त्यांनी २ लाखांत स्वत:चे घर विकले. २ लाख ८० हजार ८५ रुपये बर्डेला देत नवीन घराचा अधिकृत करार करून घेतला. फ्लॅटचा ताबा मिळाल्यानंतर उर्वरित पैसे देण्याचे ठरले होते.पुढे बर्डेने कांदिवलीच्या संक्रमण शिबिरात दोघांचे स्थलांतर केले. हक्काच्या घराच्या स्वप्नात १५ वर्षे त्यांनी याच खुराड्यात काढली. अखेर नवीन इमारत उभी राहिली. आता त्यात घर मिळणार आणि हा वनवास संपणार म्हणून ते पुन्हा उभे राहिले. मात्र २०१७ मध्ये बर्डेने परवानगी नसतानाही इमारत उभी करून फ्लॅट सेल केल्याचे उघड झाले आणि त्यात संसार थाटण्यापूर्वीच ती इमारत जमीनदोस्त करण्यात आल्याने दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. त्यातून सावरत नाहीत तोच, पुढे बर्डेच्या कंपनीचा एसडी कॉर्पोरेशनसोबत झालेल्या वादानंतर राहत असलेल्या संक्रमण शिबिराचा ताबा एसडीकडे आला. त्यामुळे त्या कंपनीने २०१८च्या अखेरीस त्यांना घर खाली करण्यास सांगितले आणि ते आजी-आजोबा थेट रस्त्यावरच आले. अखेर स्थानिक नेत्यांच्या पायºया झिजविल्यानंतर केवळ तीन महिन्यांसाठी कांदिवलीच्या संक्रमण शिबिरात त्यांना आसरा देण्यात आला आहे. संसार बांधूनच आहे. फक्त जेवणासाठीची काही भांडी आणि अंथरूण बाहेर आहे. आता इथून हकालपट्टी झाल्यावर जायचे कुठे? किमान मरेपर्यंत तरी डोक्यावर छत असावे एवढीच इच्छा असल्याचे सरिता आजी सांगतात. देव देव करण्याच्या वयात घर घर करण्याची वेळ आली हे सांगताना आजींचे डोळे पाणावले होते.-----------------------------------------धमक्यांमुळे भीतीचे सावटबर्डेसहित त्यांच्या माणसांकडून दमदाटी केली जात आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून जगत आहोत. याबाबतही पोलिसांत तक्रार दिल्याचे ताह्मणकर दाम्पत्याने सांगितले.मुख्यमंत्र्यांकडूनही मदत नाही...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मदतीसाठी अर्ज केले. मात्र प्रतिसाद न मिळाल्याचेही ताह्मणकर दाम्पत्य सांगते. अखेर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरून राजेंद्र बर्डेसह त्याचे बंधू दत्तात्रय व नरेंद्र बर्डेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिंपळे यांनी दिली.
Video : कोणी घर देतं का घर...?; वृद्ध दाम्पत्याचा आर्त टाहो!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 6:46 AM