आरेतील आदिवासींना मिळणार ४८० चौरस फुटांचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:29 AM2019-03-05T00:29:00+5:302019-03-05T00:29:04+5:30
आरेमधील आदिवासींना लवकरच आरेमध्येच हक्काचे घर मिळणार आहे. यासाठी आरेतील २७ आदिवासी पाड्यांतील आदिवासींच्या घरांच्या सर्वेक्षणाचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी संबंधित विभागास दिले.
मुंबई : आरेमधील आदिवासींना लवकरच आरेमध्येच हक्काचे घर मिळणार आहे. यासाठी आरेतील २७ आदिवासी पाड्यांतील आदिवासींच्या घरांच्या सर्वेक्षणाचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी संबंधित विभागास दिले. सर्वेक्षणाचे काम सुरू करताना फोर्सवन येथील आदिवासी पाड्यांच्या सर्वेक्षणासाठी प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
आरेतील १२५ एकर जागेवर आरेतील आदिवासींचे पुनर्वसन करण्यात येणार असून येथील आदिवासींना ४८० चौरस फुटांचे घर देण्यात येणार आहे. अन्य लोकांना ३०० चौरस फुटांचे घर देण्यात येणार आहे, असे वायकर यांनी सांगितले. आदिवासींना घरे देताना बीडीडीच्या चाळींचा विकास करताना ज्या सवलती देण्यात आल्या आहेत, त्या सवलती आदिवासींनाही देण्यात याव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपड्या तसेच आरेतील झोपड्यांचे पुनर्वसन करताना एकाच विकासकाला याचे काम न देता, एका विकासकाला जास्तीतजास्त ५ हजार घरे बांधण्यास देणे उचित ठरेल, असेही ते म्हणाले.