मुंबई : मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना चौपाटीवर आल्यानंतर ‘बादशाही’ राहणीमानाचा अनुभव मिळावा यासाठी ‘हाउसबोट’चा पर्याय देण्याचा विचार एमटीडीसीकडून (महाराष्ट्र पर्यटक विकास महामंडळ) केला जात आहे. त्यासाठी तारकर्ली चौपाटी येथून स्वत:च्या मालकीची हाउसबोट बेलापूर येथे आणण्यात आली आहे. मात्र मुंबईतील चौपाट्यांवर बोट चालवावी की बेलापूर, वाशी, उरण या खाडीपट्ट्यात यावर सध्या एमटीडीसीकडून विचार केला जात आहे. एमटीडीसीकडून पर्यटनाच्या दृष्टीने मुंबईतील चौपाट्यांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. तसे नियोजनच केले जात असून, यात जुहू, गिरगाव, वर्सोवा चौपाट्यांचा समावेश आहे. या चौपाट्यांवर वॉटर स्पोटर््ससोबतच अनेक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. त्याचबरोबर पाण्यावर चालणारी आणि रस्त्यावर धावू शकणारी अशी अॅम्फिबियस बसही परदेशातून मुंबईत आणली जाणार आहे. यानंतर एमटीडीसीकडून हाउसबोट सुरू करण्यावर भर दिला आहे. यासाठी तारकर्ली येथून हाउसबोट आणण्यात आली आहे. यासंदर्भात एमटीडीसीचे व्यवस्थापक (साहसी क्रीडा) सुबोध किनळेकर यांना विचारले असता, सध्या ही बोट बेलापूर येथील खाडीत उभी करण्यात आली आहे. मुंबईतील चौपाट्यांवर बोट चालविण्याचा आमचा विचार असला तरी या बोटीला स्थिर पाणी लागते आणि अशा प्रकारे स्थिर पाणी हे खाडीतच असते. त्यामुळे बेलापूर, वाशी, उरण पट्ट्यातील खाडीत चालवून ती पर्यटकांना उपलब्ध करता येऊ शकते का याचा विचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तारकर्ली येथे एका दिवसाचे भाडे १0 हजार रुपये एवढे होते. पण येथे आता यापेक्षा कमी भाडे ठेवण्याचा विचार केला जात आहे. बोटीच्या प्रथम चाचण्या केल्या जातील आणि आॅक्टोबरपासून हाउसबोट पर्यटकांसाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुंबईत पर्यटकांसाठी ‘हाउसबोट’?
By admin | Published: June 04, 2016 2:06 AM