मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी हॉस्टेलमधील कॅण्टीनचा दर्जा कधी सुधारणार?

By रेश्मा शिवडेकर | Published: May 28, 2024 08:41 PM2024-05-28T20:41:44+5:302024-05-28T20:42:09+5:30

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्याच्या जेवणात माशी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर

Housefly was found in the khichdi of Mumbai University student | मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी हॉस्टेलमधील कॅण्टीनचा दर्जा कधी सुधारणार?

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी हॉस्टेलमधील कॅण्टीनचा दर्जा कधी सुधारणार?

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थी वसतीगृहाच्या कॅण्टीनमधील अस्वच्छता आणि सुमार दर्जाच्या खाद्यपदार्थांमुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या मनस्तापाची मालिका अजुनही सुरूच आहे. सोमवारी रात्री येथे एका विद्यार्थ्याच्या खिचडीत माशी सापडल्याचा प्रकार उघडकीस आला. कधी झुरळ, तर कधी डास, खाद्यपदार्थांमध्ये आढळून येणे हे जणू इथली नित्याची बाब झाली आहे. मुख्य म्हणजे याबाबत हॉस्टेलच्या प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही काहीच फरक पडलेला नाही.

आता विद्यार्थ्यांनी पालिकेकडे आणि एफडीएकडे 

कॅण्टीनच्या जेवणाच्या सुमार दर्जाबाबत तक्रार केली आहे. कॅण्टीनमध्ये पुरेशी स्वच्छता नसते. खाद्यपदार्थ बनविण्याकरिता वापरले जाणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असते. तसेच, ते बनविण्याकरिता वापरली जाणारी भांडी, साठविण्याकरिता असलेली जागाही अस्वच्छ असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. यामुळे आपल्याला पोटाचे विकार होण्याची भीती विद्यार्थ्यांनी पालिकेला लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून एफडीएने या कॅण्टीनमधील अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. त्याचा अहवाल अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्या आधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कॅण्टीनची तपासणी करून इथल्या अस्वच्छतेवर बोट ठेवत हे कॅण्टीन निकषांची पूर्तता करत नसल्याचा अहवाल दिला होता.

एफडीएच्या अहवालाचे काय झाले

एफडीएच्या टीमने येथील कॅण्टीनला भेट देत अन्नाचे नमुने ताब्यात घेतले. तयार भाज्या, डाळ, अंडा बिर्याणीचे नमुने एफडीएने ताब्यात घेण्यात आले होते. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार होती. हे अन्नपदार्थ फूड सेफ्टी अण्ड स्टॅण्डर्ड्स अक्ट, २००६ नुसार आहेत, हे तपासले जाणार होते. मात्र हा अहवाल अद्याप आलेलाच नाही.
 

Web Title: Housefly was found in the khichdi of Mumbai University student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.