Join us

घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळणार, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत पाच हजार लाभार्थ्यांना मंजुरी

By सचिन लुंगसे | Published: March 13, 2024 6:52 PM

Pradhan Mantri Suryaghar Free Electricity Scheme: तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरु आहे. या योजनेचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला असून, राज्यातील पाच हजार वीज ग्राहकांना एकाच वेळी मंजुरीचे संदेश बुधवारी पाठविण्यात आले आहेत.

मुंबई - तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरु आहे. या योजनेचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला असून, राज्यातील पाच हजार वीज ग्राहकांना एकाच वेळी मंजुरीचे संदेश बुधवारी पाठविण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून या योजनेत वीज ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला साठ हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते, अशी ही योजना आहे.

नोंदणी करण्यासाठी योजनेत पीएम – सूर्यघर हे मोबाईल ॲप ग्राहकांना उपलब्ध आहे. नोंदणी केल्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या रूफ टॉप सोलर प्रकल्पांसाठी महावितरण ग्राहकांना मदत करते. महावितरणच्या पुढाकाराने यापूर्वी राज्यात १ लाख ३८ हजार ग्राहकांनी रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविले आहेत. त्यांची एकूण क्षमता १९०० मेगावॅट आहे. यामध्ये एक लाख घरगुती ग्राहकांचा समावेश आहे.- लोकेश चंद्र, अध्यक्ष, महावितरण 

टॅग्स :वीजकेंद्र सरकार