घरगुती वीज बिल भरणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 04:23 PM2020-08-25T16:23:01+5:302020-08-25T16:24:09+5:30
वीज बिल माफी मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही
मुंबई : घरगुती वीज ग्राहकांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली अत्यंत तोकडी सवलत मान्य नाही. कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या व दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणा-या मुंबईसह राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची वीज बिले संपूर्ण माफ झाली पाहीजेत. त्यासाठी लागणारी अंदाजे ४५०० कोटी रुपयांची भरपाई राज्य शासनाने केली पाहिजे. हा निर्णय होईपर्यंत ग्राहक वीज बिले भरणार नाहीत. निर्णय झाला नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांनी सरकारला दिला आहे.
कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या व दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणा-या मुंबईसह राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची वीज बिले संपूर्ण माफ झाली पाहीजेत या मागणीसाठी राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा, तालुका, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती स्तरांवर विविध ठिकाणी वीज बिलांची होळी आंदोलन करण्यात आले आहे. राज्य सरकारकडे निवेदन देण्यात आले. २० जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. निवेदन देण्यात आले. तरीही राज्य सरकारने अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.