घरातला कचरा डम्पिंगला जाणार; वीज बनणार अन् बल्ब पेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:14 PM2023-11-25T12:14:19+5:302023-11-25T12:14:53+5:30
देवनार आणि कांजूर डम्पिंगच्या कचऱ्यामधून होणार वीजनिर्मिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डम्पिंग ग्राउंडवर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यातून वीज निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे घरातील बल्प पेटणार आहेत. देवनार आणि कांजूरमार्ग या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पातून २०२५ - २६ सालापर्यंत वीजनिर्मिती सुरू होईल.
या प्रकल्पासाठी समितीची नियुक्ती केली जाणार असून, त्यात केंद्रीय सचिव, राज्याचे प्रधान सचिव, मुंबई महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांचा समावेश असेल. ही समिती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुलुंड, कांजूर आणि देवनार येथील कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट कशी लावता येईल, याबाबतचा अहवाल तयार करेल. या अहवालात कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या पर्यायांचा समावेश असेल.
कचऱ्यातून १०० मेगावॅट वीजनिर्मिती
डम्पिंग ग्राउंडची समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. या कचऱ्यातून १०० मेगावॅट वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. देवनार आणि कांजूर डम्पिंग ग्राउंडवर रोज सुमारे सात हजार मेट्रिक टन कचरा टाकला जातो.
मुंबईत निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी ९० टक्के कचरा कांजूर डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. देवनार डम्पिंग ग्राउंडचा भर हलका करण्यासाठी कांजूर येथे बायोरिएक्टर पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते.
वीजनिर्मिती
करण्याचे प्रकल्प
या प्रकल्पातून भविष्यात १,८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे.
कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या विजेपैकी काही विजेचा वापर याच ठिकाणी केला जाईल.
देशातील अनेक शहरात कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचे प्रकल्प सुरू आहेत. महाराष्ट्र याबाबतीत पिछाडीवर आहे.
यावर्षी पिंपरी - चिंचवडमध्ये कचऱ्यापासून वीज निर्माण करणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे.
देवनार : ६०० मेट्रिक
टन कचरा
देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये रोज ६०० मेट्रिक टन कचरा टाकला जातो. प्रकल्पाच्या पहिल्या टप्य्यात या कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाईल.
या ठिकाणी प्रकल्प सुरू करण्याची चर्चा मागील १० वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आता प्रकल्प प्रत्यक्ष आकारास येण्याची आशा आहे.
केंदीय शहर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासोबत राज्य सरकार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कचऱ्याच्या समस्येवर अलीकडेच चर्चा झाली. या चर्चेत कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यावर एकमत झाले.