झोपडी पाडल्यापासून घरे पाच वर्षांनी विकता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 06:13 AM2021-03-13T06:13:39+5:302021-03-13T06:13:46+5:30

‘एसआरए’बाबत जितेंद्र आव्हाड यांंची माहिती

The houses can be sold five years after the demolition of the hut | झोपडी पाडल्यापासून घरे पाच वर्षांनी विकता येणार

झोपडी पाडल्यापासून घरे पाच वर्षांनी विकता येणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसआरए प्रकल्पातील सदनिका पाच वर्षांनी विकण्याची मुभा देतानाच हा कालावधी झोपडी पाडल्यापासूनचा गृहीत धरावा, यासाठी लवकरच नियमात बदल करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी सांगितले.  म्हाडा व एसआरएच्या संयुक्त विद्यमाने कोळीवाडे वगळता मुंबईतील किनाऱ्यालगतच्या झोपडपट्टयांच्या विकासाबाबत दीड महिन्यात धोरण तयार करणार असल्याचेही आव्हाडांनी सांगितले.

‘एसआरए’त इमारत उभी राहिल्यानंतर पाच वर्षांपर्यंत सदनिका विकता येत नाही. पण, अनेक प्रकल्प दहा-दहा वर्षे रखडतात. त्यामुळे झोपडपट्टीधारकांची अडचण होते. म्हणून झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी सदनिका विकण्याची मुभा देण्याबाबतचा नियम बनविला जाईल. तसेच एसआरएमधील विकलेली घरे खाली करण्याची नोटीस विभागाने बजावल्या आहेत. त्यावर तोडगा काढून न्यायालयात भूमिका मांडण्यासाठी मंत्र्याची समिती बनवली असून, यात संबंधित विषयावर चर्चा केली जाईल, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. मुंबईत कुलाबाच्या बधवार पार्कपासून ते दहीसरपर्यंत किनारपट्टीवर ५५ झोपडपट्टया आहेत. एसआरए व म्हाडाच्या माध्यमातून इथे पुनर्विकास  केल्यास परवानग्या लवकर मिळतील. यातून शासनाला मोठा निधी मिळू शकतो, असेही आव्हाड म्हणाले. मुंबईसह ठाणे, पुणे आदी शहरांमध्ये गृहनिर्माण प्रकल्पांतील म्हाडासाठी राखीव २०% घरे अनेक ठिकाणी वर्ग केलेली नाहीत. ती तत्काळ म्हाडाकडे वर्ग न केल्यास कारवाईचा  इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

‘बीडीडी’चे काम ४ वर्षांत
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ या महिन्यात होणार असून तीन ते चार वर्षांत काम पूर्ण होईल असेही आव्हाड यांनी सांगितले.

Web Title: The houses can be sold five years after the demolition of the hut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.