पावसामुळे दाणादाण, पडझड; शहरात दहा ठिकाणी घरांचे नुकसान, नाल्यात पडून महिलेचा मृत्यू, चौघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 06:17 AM2024-09-27T06:17:10+5:302024-09-27T06:17:23+5:30

अंधेरी पूर्वेच्या सीप्झ परिसरात बुधवारी मुसळधार पावसात एका महिलेचा रस्त्यालगतच्या छोट्या नाल्यात पडून मृत्यू झाला

Houses damaged in 10 places due to rain in Mumbai | पावसामुळे दाणादाण, पडझड; शहरात दहा ठिकाणी घरांचे नुकसान, नाल्यात पडून महिलेचा मृत्यू, चौघे जखमी

पावसामुळे दाणादाण, पडझड; शहरात दहा ठिकाणी घरांचे नुकसान, नाल्यात पडून महिलेचा मृत्यू, चौघे जखमी

मुंबई : परतीच्या पावसाचा मुंबईला बुधवारी रात्री जोरदार दणका बसला. रस्ते जलमय झाल्याने एका महिलेचा नाल्यात पडून मृत्यू झाला तर दहा ठिकाणी घरांची पडझड झाली. या पडझडीत चार जण जखमी झाले. 

अंधेरी पूर्वेच्या सीप्झ परिसरात बुधवारी मुसळधार पावसात एका महिलेचा रस्त्यालगतच्या छोट्या नाल्यात पडून मृत्यू झाला. विमल गायकवाड (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. अंधेरी एमआयडीसीत एमएमआरडीएमार्फत भुयारी मेट्रोचे काम चालू आहे. त्या  ठिकाणी महिला नाल्यात पडल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यांनी तिला बाहेर काढून कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे महिलेला मृत घोषित करण्यात आले. या दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे. दरम्यान, पावसामुळे शहरात दोन, पूर्व उपनगरांत सात व पश्चिम उपनगरांत एक, अशा दहा ठिकाणी घरांची पडझड झाली.

मेट्रो स्थानकात गळती

मुसळधार पावसात मेट्रो ७ मार्गिकेवरील जोगेश्वरी पूर्व मेट्रो स्थानकात पाण्याची गळती झाली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियातून प्रसारित झाला. याबाबत एमएमएमओसीएलकडे विचारणा केली असता पावसाचे पाणी वाहून नेणारी पाइप पाण्याच्या प्रेशरमुळे एका जागेवरून सरकली होती. ही घटना समोर येताच बुधवारी रात्रीच भरपावसात पथकाने या पाइपची दुरुस्ती केली, अशी माहिती एमएमएमओसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिली.

घराची भिंत कोसळली

भांडुपमधील तुळशीपाडा परिसरात गायत्री विद्यामंदिराजवळील चाळीतील एका घराची भिंत कोसळून तीन जण जखमी झाले.  या दुर्घटनाग्रस्त घरात चौघे अडकले होते. पण अग्निशमन दलाने तातडीने मदतकार्य करून चौघांची सुटका केली. 

यामध्ये क्रांती पाठोळे (२६), शीला पाठोळे (४५), सुरेंद्र पाठोळे (५६) हे जखमी झाले. जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील क्रांती आणि शीला यांना  उपचारानंतर घरी पाठविण्यात आले, तर सुरेंद्र यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत. 

दुसऱ्या घटनेत हनुमाननगर खदान येथे डोंगरावरील माती व दगड घरावर घसरल्याने ४५ वर्षीय महिला जखमी झाली होती. तिला कांदिवलीतील रुग्णालयात दाखल केले असून, तिची प्रकृती स्थिर आहे. 

१२ ठिकाणी शॉर्टसर्किट 

मुंबईतील अनेक भागांमध्ये बुधवारी सायंकाळी पाणी साचले होते. शिवाय वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सतर्क होऊन विविध यंत्रणांना सतर्क केले. पर्जन्य जलवाहिन्या विभागातील कामगारही रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावत होते. 

पावसामुळे शहरात पाच, पूर्व उपनगरात दोन व पश्चिम उपनगरात १४, अशा एकूण २१ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्या. त्याचबरोबर शहरात नऊ, पूर्व व पश्चिम उपनगरात १२, अशा एकूण २१ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. पालिका प्रशासनाने तत्काळ विद्युत पुरवठा यंत्रणेस या घटनांची माहिती देऊन मदत कार्यासाठी रवाना केले. सुदैवाने या घटनांमध्ये कोणीही जखमी  झाले नाही.
 

Web Title: Houses damaged in 10 places due to rain in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.