Join us

भरपावसात मालाडमध्ये तोडली घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:05 AM

मुंबई : कुरार मेट्रोमध्ये बाधित होणाऱ्या मालाड पूर्वेकडील रहिवाशांच्या घरांवर तुघलकी कारवाई करीत एमएमआरडीएने पोलीस बळाचा वापर करीत भरपावसात ...

मुंबई : कुरार मेट्रोमध्ये बाधित होणाऱ्या मालाड पूर्वेकडील रहिवाशांच्या घरांवर तुघलकी कारवाई करीत एमएमआरडीएने पोलीस बळाचा वापर करीत भरपावसात बुलडोझर फिरविला. विरोध करणाऱ्या रहिवाशांना पोलिसांनी नग्न करून अमानुषपणे मारहाण केली, असा आरोप मुंबई भाजप प्रभारी व कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला. यावेळी आमदार भातखळकर यांना अटक करण्यात आली.

मराठी माणसाच्या नावावर पक्षाचे दुकान चालविणाऱ्यांनी मराठी माणसालाच उद्ध्वस्त केले आहे. कुरार मेट्रो स्थानकाचे नोव्हेंबरमध्ये उद्घाटन करण्याचा घाट ठाकरे सरकारने घातला आहे. मुख्यमंत्र्यांना उद्घाटनाची घाई झालेली असल्यामुळे ‘कोणत्याही परिस्थितीत ही वस्ती हटवा’, असे आदेश एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला.

गिरगाव पॅटर्ननुसार आहे त्या ठिकाणी घरांचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी इथे आंदोलनही केले. गोरेगाव पश्चिमेतील एका इमारतीत स्थलांतरित होण्यासाठी एमएमआरडीएचा दबाव सुरू होता. या इमारतीत अलीकडेच स्लॅब पडून एकाचा मृत्यू झाला असल्याने इथे जाण्यास रहिवाशांचा विरोध होता. रहिवाशी ऐकत नसल्याचे बघून ठाकरे सरकारने दहशतीचा बडगा उगारला. शुक्रवारी रात्री १२ वाजता रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली आणि सकाळीच पोलिसांच्या ताफ्यासह इथे बुलडोझर मागवून कारवाई सुरू करण्यात आली. विरोध करणाऱ्या महिलांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यांना गाड्यांमध्ये कोंबून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत नेण्यात आले. पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून आमदार अतुल भातखळकर यांना जबरदस्तीने अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व पावसात घरे तोडू नये, असा मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्देश आहे. परंतु कायदा धाब्यावर बसवून घरांवर बुलडोझर घालण्यात आले. गिरगाव पॅटर्नप्रमाणे पुनर्वसन करा, ही मागणी करणे हा काय गुन्हा आहे काय? रहिवासी घरे सोडायला तयार होते, आमचे स्थानिक ठिकाणीच पुनर्वसन व्हावे व पावसात घरे तोडू नका व एवढीच त्यांची विनंती होती; परंतु आपला अहंकार जपण्यासाठी ठाकरे सरकारने बहुसंख्य मराठी वस्ती असलेल्या मालाडमधील घरांवर मोगलही लाजले असते, अशा पद्धतीने कारवाई केली, अशी टीका आमदार भातखळकर यांनी केली.

फोटो आहे = १७ मालाड