मुंबई उपनगरातील घरे २५ टक्क्यांनी महागणार? टीडीआरचे दर दुपटीने वाढल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 10:02 AM2024-05-16T10:02:03+5:302024-05-16T10:04:35+5:30

येत्या वर्षभरामध्ये किमान २५ टक्क्यांनी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. 

houses in mumbai suburbs will cost 25 percent result of doubling of tdr rates | मुंबई उपनगरातील घरे २५ टक्क्यांनी महागणार? टीडीआरचे दर दुपटीने वाढल्याचा परिणाम

मुंबई उपनगरातील घरे २५ टक्क्यांनी महागणार? टीडीआरचे दर दुपटीने वाढल्याचा परिणाम

मुंबई : मुंबईतील विशेषतः उपनगरातील झोपडपट्टी पुनर्विकासातील विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर)च्या दरांत दुपटीने वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर तेथील घरांच्या किमती येत्या वर्षभरामध्ये किमान २५ टक्क्यांनी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. 

पूर्व उपनगरात मुलुंड येथील टीडीआरचे दर सहा महिन्यांपूर्वी प्रति चौरस फूट साडेतीन हजार रुपये इतके होते. यामध्ये घसघशीत वाढ होत आता प्रति चौरस फुटांकरिता हे दर सहा हजार रुपये इतके झाले आहेत. तर, पश्चिम उपनगरात सहा महिन्यांपूर्वी बोरीवली येथे टीडीआरचे प्रति चौरस फुटांचे दर तीन हजार रुपये इतके होते. ते दर आता पाच हजार ७०० रुपयांवर पोहोचले आहेत. 

मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये सध्या तेजी आहे. गेल्या वर्षभरात मुंबई व उपनगरात दीड लाखापेक्षा जास्त घरांची विक्री झाली आहे. तर, गेल्या चार महिन्यांत आतापर्यंत ४० हजारांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली आहे. घरांची वाढती मागणी लक्षात घेता अनेक विकासकांनी नव्या गृहनिर्माण प्रकल्पांचे काम सुरू केले आहे. मूळच्या जागेखेरीज अधिक घरे बांधण्याच्या दृष्टीने टीडीआर विकत घेण्याकडे बहुतांश विकासकांचा कल आहे. टीडीआरच्या मागणीमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याचे विश्लेषण या उद्योगातील जाणकारांनी केले आहे. 

टीडीआर म्हणजे काय?

एखाद्या जागेवर किती बांधकाम करायचे याची मर्यादा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय)द्वारे निश्चित होते. मात्र मान्यताप्राप्त एफएसआयपेक्षा जास्त बांधकाम करायचे असेल तर त्याकरिता विकासकाला अन्य प्रकल्पांतून मिळणारा विकास हक्क विकत घेता येतो. या टीडीआरद्वारे संबंधित जागेवर निश्चित एफएसआय मर्यादेपेक्षा त्याला अधिक बांधकाम करता येते. मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकासाचे काम करणाऱ्या विकासकाला संबंधित जमिनीच्या अनुषंगाने विशिष्ट टीडीआर दिला जातो. हा टीडीआर त्याला अन्य प्रकल्पात अतिरिक्त बांधकामाच्या रूपाने वापरता येतो.

कच्चा मालही महाग-

घरांच्या किमती वाढण्यामागचे आणखी प्रमुख कारण म्हणजे, एकीकडे महागड्या दराने विकासकांना टीडीआर विकत घ्यावा लागत आहे, तर दुसरीकडे घर बांधणीसाठी आवश्यक कच्चा मालाच्या किमतीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. परिणामी आगामी काळात घरांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: houses in mumbai suburbs will cost 25 percent result of doubling of tdr rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.