Join us

दुरुस्ती मंडळ देणार म्हाडाला घरे

By admin | Published: October 26, 2015 1:31 AM

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या (आर आर मंडळ) संक्रमण शिबिरात वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या नागरिकांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मास्टर लिस्ट

मुंबई : मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या (आर आर मंडळ) संक्रमण शिबिरात वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या नागरिकांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मास्टर लिस्ट अखेर जाहीर झाली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये दुसरी मास्टर लिस्ट जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर आर आर मंडळाकडे शिल्लक राहणारी सुमारे पाचशे घरे मुंबई मंडळाला लॉटरीसाठी देण्यात येणार आहेत. यामुळे मुंबई मंडळाला लॉटरीसाठी काही घरे मिळणार आहेत.संक्रमण शिबिरात अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या नागरिकांना आर आर मंडळामार्फत दिलासा देण्याचे काम सुरू आहे. या वर्षी आर आर मंडळाने पहिल्या मास्टर लिस्टमध्ये ३२३ अर्जदारांना गाळे वितरित केले आहेत. तर उर्वरित २४0 अर्जदारांबाबत छाननीची प्रक्रिया सुरू असून, त्यांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय बृहत् सूची समितीद्वारे घेण्यात येणार आहे. त्यानंतर या वर्षातील दुसरी मास्टर लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे. सध्या आर आर मंडळाकडे सुमारे साडेसातशे घरे तयार आहेत. यापैकी २४0 घरे दुसऱ्या मास्टर लिस्टमधील अर्जदारांना दिल्यानंतर सुमारे पाचशे घरे मंडळाकडे शिल्लक राहणार आहेत. ही घरे मुंबई मंडळाला लॉटरीसाठी देण्यात येतील, असे आर आर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मुंबई मंडळाला सुमारे ५00 घरे लॉटरीसाठी उपलब्ध होणार असून, त्यामधून मुंबईकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.सध्या मुंबई मंडळाकडे लॉटरीसाठी घरे उपलब्ध नाहीत. आर आर मंडळाची काही घरे मुंबई मंडळाला मिळाल्यास मुंबईकरांसाठी मंडळाला लॉटरी काढता येणार आहे. आर आर मंडळाने डिसेंबरपूर्वी ही घरे मुंबई मंडळाला दिल्यास जानेवारी महिन्यात काढण्यात येणाऱ्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये या घरांचा समावेश होऊ शकेल. (प्रतिनिधी)